मुंबई: ‘पुष्पा.. पुष्पाराज.. मै झुकेगा नहीं’, ‘पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझी क्या? आग है मै’ हे डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहेत हे वेगळं सांगायला नको. अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. ‘पुष्पा: द रूल’ या सीक्वेलची सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच आता पुष्पा 1 चा रशियन भाषेतील ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कारण हा चित्रपट येत्या 8 डिसेंबर रोजी रशियामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘पुष्पा: द राईज’ हा मूळ तेलुगू भाषेतील चित्रपट आहे. चंदन तस्करी करणाऱ्या पुष्पाराजची कथा यात दाखवण्यात आली आहे. अल्लू अर्जुनसोबत यामध्ये रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत येत्या 1 डिसेंबर रोजी मॉस्को आणि 3 डिसेंबर रोजी सेंट पीटर्सवर्ग इथं विशेष प्रीमिअर पार पडणार आहे.
रशियातील 24 शहरांमध्ये होणाऱ्या पाचव्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन समारंभात या चित्रपटाचा प्रीमिअर होणार आहे. या चित्रपटाने संपूर्ण देशातील प्रेक्षकांना वेड लावलं. त्यानंतर आता रशियन प्रेक्षकांवर राज्य करण्यासाठी ‘पुष्पा’ तयार आहे.
काही दिवसांपूर्वीच पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनचा लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. ‘पुष्पा: द रूल’ या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. पहिल्या भागाच्या अखेरीस फहाद हा या चित्रपटाचा मूळ खलनायक बनला होता.
पुष्पाच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन सुकुमारने केलं होतं. सीक्वेलचंही दिग्दर्शन तोच करणार आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आता सीक्वेलसाठी बजेट वाढवल्याचंही समजतंय. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट तब्बल 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनणार असल्याचं कळतंय. हा चित्रपट मूळ तेलुगू भाषेत असून संपूर्ण भारतात तो तेलुगूसोबतच हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.