“नमस्कार, कसं काय?….” स्टेजवर येताच अल्लू अर्जूनचा मुंबईकरांशी मराठीत संवाद; टाळ्या,शिट्ट्या अन् जल्लोष
अल्लू अर्जुनने मुंबईकरांशी मराठीत बोलून त्यांचे मन जिंकले आहे. 'पुष्पा 2 द रूल' च्या प्रमोशनसाठी तो मुंबईत आला होता. तेव्हा कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावर सर्व प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवत त्याचे स्वागत केले.
सध्या प्रेक्षकांना वेध लागले आहेत ते ‘पुष्पा 2’चे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तर प्रेक्षकांची उत्सुकता अजून शिगेला पोहोचली आहे. ‘पुष्पा 2’ची टीम सध्या सर्वत्र चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रमोशनमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. अल्लू अर्जुनने आतापर्यंत चेन्नई, कोची आणि पटनासारख्या शहरात प्रमोशन केलं असून तो नुकताच मुंबईत ‘पुष्पा 2 द रूल’चं प्रमोशन करण्यासाठी आला होता. तेव्हा त्याने मुंबईकरांसोबत मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
मुंबईत ‘पुष्पा 2 द रूल’ प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान अल्लू अर्जुनने मराठी बोलल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.हा व्हायरल व्हिडिओ ‘सिनेब्लूज’ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेला आहे.
View this post on Instagram
कार्यक्रमात स्टेजवर येताच अल्लू अर्जुनचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी निवेदकाने त्याला उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधण्याची विनंती केली. त्यावेळी अल्लू अर्जुन हाती माईक घेतो आणि सर्वांना “नमस्कार” असं बोलून मान खाली करून अभिवादन करतो. त्यानंतर पुढे तो “कसं काय मुंबईकर” असं म्हणतो. उपस्थित लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्याच्या या मराठी बोलण्याच्या प्रयत्नाला दाद देतात. मराठीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
अल्लू अर्जुनची मराठीत बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही तीन वर्षांपूर्वी पुष्पाच्या पहिल्या भागावेळी अल्लू अर्जुन मुंबईत आला होता, तेव्हा त्याने सर्वांशी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता.
अॅक्शन-ड्रामा असणाऱ्या ‘पुष्पा द रुल’चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करच असून आणि पहिल्याही भागाचं दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे. ‘पुष्पा द रुल’चित्रपट येत्या ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट 2024 मधील सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपटाने आतापर्यंत ओटीटी राईट्स, प्री बुकिंग आणि टेलिव्हिजन राईट्समधून चित्रपटाचं प्रदर्शन होण्याआधी जबरदस्त कमाई केलेली आहे. त्यामुळे रिलीजच्या आधीच करोडोंचा गल्ला जमवलेला हा पहिलाच चित्रपट ठरत असल्याचे म्हटले जात आहे.