‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. ‘पुष्पा 2’चे ओटीटी हक्क विकले गेले आहेत. या डीलद्वारे चित्रपटाच्या बजेटचा अर्धा खर्च भरून निघाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि नेटफ्लिक्स यांच्यात कोट्यवधी रुपयांचा करार झाला आहे.
अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे ओटीटी राइट्स तब्बल 270 कोटी रुपयांना विकले गेल्याचं कळतंय. त्यामुळे डिजिटल राइट्सच्याबाबतीत हा चित्रपट देशातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटाचा बजेट तब्बल 500 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त रकमेची कमाई आताच झाली आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा ओटीटीवर विकला जाणारा चौथा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी तिसऱ्या क्रमांकावर ‘केजीएफ: चाप्टर 2’ असून त्याचे डिजिटल राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने 320 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट आहे. प्रभासच्या या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सने 175 कोटी रुपयांना आणि प्राइम व्हिडीओने 200 कोटी रुपयांना विकत घेतले होते. या दोन्हींची किंमत मिळून तब्बल 375 कोटी रुपये इतकी होती. तर पहिल्या क्रमांकावर एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्स, झी 5 आणि डिस्ने प्लस हॉटस्टारने 385 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता. ‘पुष्पा’ने केवळ देशभरातच नाही तर परदेशातही तगडी कमाई केली होती. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्स आजसुद्धा अनेकांना तोंडपाठ आहेत. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘पुष्पा : द रुल’ची प्रचंड उत्सुकता आहे.