मुंबई : ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळाने सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये अक्षय देवाला तेल आणि पाणी अर्पण करण्याविषयी बोलताना दिसत आहे. ‘OMG 2’ हा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘OMG’चा सीक्वेल आहे. या सीक्वेलमध्ये अक्षयसोबतच पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘ओह माय गॉड 2’चा टीझर काहींना खूप आवडला तर काही नेटकऱ्यांनी त्यातील सीन्सवर आक्षेप घेतला. यादरम्यान आता अक्षय कुमारचा जुना व्हिडीओत चर्चेत आला आहे.
अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान याने ट्विटरवर अक्षयचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांनी देवावर इतकं तेल आणि दूध वाया घालवणं कसं थांबवावं आणि त्याऐवजी उपासमारीमुळे आणि पैशांच्या अभावी मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्यांना अन्न कसं द्यावं याविषयी तो या व्हिडीओत बोलताना दिसतोय. “तुम्ही देवावर इतकं तेल आणि पाणी का वाया घालवत आहात? हे असं कुठे लिहिलेलं आहे की देव म्हणतो, मला दूध द्या आणि हनुमान म्हणतात की मला तेल द्या. मला समजत नाही की लोक या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर का वाया घालवतात? त्याचवेळी आपण म्हणत असतो की उपासमारीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय. तर मग तेच तेल आणि पाणी शेतकऱ्यांना द्या. मी मंदिरात जातो तेव्हा मला तिथे या गोष्टींची नासाडी होताना दिसते”, असं तो म्हणाला.
‘OMG 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. अनेकांनी त्याच्या लूकविषयी आणि चित्रपटाच्या कथेविषयी कुतूहल व्यक्त केलं आहे. तर काहींनी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत अशी अपेक्षा केली आहे. ‘या चित्रपटात सनातन धर्माची मस्करी होऊ नये’, असं एकाने लिहिलं. तर ‘अपेक्षा हीच आहे की सनातन धर्माचा आदर केला जावा’ असं दुसऱ्याने म्हटलंय. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2012 मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. मात्र सीक्वेलची कथा पूर्णपणे वेगळी असल्याचं कळतंय.