‘इमर्जन्सी’च्या वादादरम्यान कंगना राणौतने उचललं मोठं पाऊल, मुंबईतील आलिशान फ्लॅटची विक्री, कोण आहे नवा मालक ?
अभिनेत्री कंगना राणौत सध्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, मात्र एका वादामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिलेले नाही. या सगळ्या दरम्यान, कंगना यांनी एक मोठा निर्णय घेत त्यांचा मुंबईतील पाली हिल येथील फ्लॅट विकल्याचे वृत्त समोर आले आहे. फ्लॅटसाठी किती किंमत मिळाली ?
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत सध्या सतत चर्चेत असतात. याला कारण आहे त्यांचा ‘इमर्जन्सी’ हा आगामी चित्रपट. शीख समुदायाने या चित्रपटाला सातत्याने विरोध केल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. याच दरम्यान कंगना यांनी एक मोठ पाऊल उचललं आहे. कंगना यांनी त्यांचा मुंबईतील पाली हिल येथील आलिशान फ्लॅट विकला आहे. रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट्सद्वार ही माहिती मिळाली आहे. कंगना यांनी 2017 साली 20 कोटी रुपयांत हा फ्लॅट खरेदी केला होता, आता 7 वर्षांनी हा फ्लॅट विकताना त्यांना 32 कोटी रुपये किंमत मिळाली आहे. या फ्लॅटचा वापर त्यांच्या मणिकर्णिका फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसचे ऑफीस म्हणून करण्यात येत होता.
बऱ्याच काळापासून विकायचा होता फ्लॅट
गेल्या महिन्यात अशी बातमी समोर आली होती की एका प्रॉडक्शन हाऊसचे ऑफीस विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र त्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आणि मालकाचे नावही गुप्त ठेवण्यात आले होते. मात्र त्या ऑफीसचे समोर आलेले फोटो आणि व्हिडीओ पाहून ते कंगना राणौत यांचेच ऑफीस असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. अनेक सोशल मीडिया युजर्सनीदेखील कमेंट करत सांगितले होते की हे कंगना यांचे घर आहे.
कोणी खरेदी केला कंगना यांचा फ्लॅट ?
हा फ्लॅट तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील कमलिनी होल्डिंग्जच्या भागीदार श्वेता बथिजा यांनी खरेदी केला आहे. 20 कोटींना विकत घेतलेला हा फ्लॅट आता 32 कोटींना विकला गेला असून कंगना यांना 12 कोटींचा नपा झाल्याचं समजतं.
बीएमसीच्या निशाण्यावर होती मालमत्ता
कागदपत्रांनुसार, कंगना यांची ही मालमत्ता 3,075 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली असून, त्याचा पार्किंग एरिया 565 स्क्वेअर फूट आहे. या कराराचे रजिस्ट्रेशन 5 सप्टेंबर रोजी झाली असून त्यासाठी 1.92 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यात आले आहे. ही तीच मालमत्ता आहे जी 2020 मध्ये BMC च्या छाननीखाली आली होती. सप्टेंबर 2020 मध्ये, बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाचा हवाला देत कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयाचा काही भाग पाडला होता. त्यावरून बराच गदारोळ देखील झाला होता. मात्र, 9 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर बांधकामे पाडण्याचे काम रखडले होते.