बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जावई निखील नंदा यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्यााची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं येथे बिग बींचे जावई आणि ट्रॅक्टर कंपनीचे मालक निखील नंदा यांच्यासह नऊ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांचे जावई आणि इतर 9 लोकांविरोधात दातागंज कोतवाली येथील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फार्मा ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरच्या आत्महत्येनंतर गंभीर प्रकरण समोर आलं आहे. निखील नंदा आणि संबंधित 9 जण कंपनीचा सेल वाढवण्यासाठी सतत एजन्सी संचालकांनी मानसिक त्रास द्यायचे. एजन्सी बंद करण्याची देखील धमकी द्यायचे. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एजन्सी संचालक जितेंद्र यांनी स्वतःला संपवलं . जितेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने 9 जणांविरोधत गुन्हा दाखल केला. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार, एजन्सी मालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ट्रॅक्टर एजन्सीचे यूपी प्रमुख, क्षेत्र व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, दातागंज कोतवाली येथील शाहजहांपूरचा व्यापारी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दातागंज कोतवाली परिसरातील पापड हमजापूर गावातील रहिवाशांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात सांगितले की, भाऊ जितेंद्र हा दातागंज येथील जय किसान ट्रेडर्स फार्म ट्रक ट्रॅक्टर एजन्सीचं काम सह-भागीदारासोबत मालक म्हणून सांभाळत होता. कौटुंबिक वादामुळे सहकारी लल्ला बाबू तुरुंगात गेला आणि पूर्ण एजन्सीची जबाबदारी जितेंद्र यांच्या खांद्यावर आली होती.
जितेंद्र यांना संबंधित 9 लोकांकडून सांगण्यात आलं होतं की, विक्री वाढत नाहीये. यामुळे परवाना रद्द केला जाईल आणि एजन्सी देखील टाळे लागतील. त्याची सर्व मालमत्ता विकली जाईल. यामुळे जितेंद्र तणावग्रस्त आणि सतत चिंतेत राहू लागला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाबाबत त्याने अनेकदा कुटुंबीय आणि मित्रांना सांगितलं होतं.
सतत मानसिक त्रास आणि शारीरिक शोषण केल्यामुळे त्रासलेल्या जितेंद्र यांनी 22 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता कोणतीही कारवाई झाली नाही. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.