मुंबई : बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे वेळेचं कठोर पालन करण्यासाठी ओळखले जातात. इंडस्ट्रीतील सर्वांत दिग्गज कलाकार असूनही सेटवर ते कधीच उशिरा पोहोचत नाहीत. एखाद्या कार्यक्रमातही जेव्हा त्यांना आमंत्रित केलं जातं, तेव्हा दिलेल्या वेळेत ते पोहोचतात. ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीतून ते नुकतेच बरे झाले असून त्यांनी शूटिंगलाही सुरुवात केली आहे. याच चित्रपटाचं सध्या मुंबईत शूटिंग सुरू आहे. या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी बिग बींनी अशी युक्ती लढवली, जे पाहून तुम्हीसुद्धा त्यांचं कौतुक कराल.
मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या बिग बींनी रस्त्यावर एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे मदत मागितली. त्या व्यक्तीच्या बाइकवर बसून ते सेटवर वेळेत पोहोचले. याचा फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ते त्या व्यक्तीच्या बाइकच्या मागे बसलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळख नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून तू तुझं काम जलदगतीने केलंस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’
बिग बींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तुम्ही या जगातील सर्वांत कूल व्यक्ती आहात’, असं एकाने लिहिलं. तर काहींनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. बाइकवर मागे बसून प्रवास केला, मात्र त्याचं नाव विचारलं नाही, असंही एका युजरने म्हटलंय. ‘तो पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला व्यक्ती आता बरेच दिवस अंघोळ करणार नाही आणि त्याची बाईकसुद्धा धुणार नाही’, असंही नेटकऱ्यांनी मस्करीत लिहिलंय.
अमिताभ बच्चन हे आता 80 वर्षांचे होणार असून बॉलिवूड इंडस्ट्रीत ते आजही तितक्याच जोमाने काम करताना दिसतात. फक्त चित्रपट आणि जाहिरातीच नाही तर ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधूनही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. ट्विटर आणि ब्लॉगद्वारे ते सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. केबीसीचा 15 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ते ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘बटरफ्लाय’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारणार आहेत.