कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आणि आपल्या स्टायलिश अंदाजाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री अमृता खानविलकरची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आली आहे. अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. गेले दोन महिने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते, असं तिने म्हटलंय. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांना मोलाचा सल्लासुद्धा दिला आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त ही पोस्ट लिहिताना तिने स्वामी समर्थांचेही आभार मानले आहेत. ‘गुरू म्हणजे पाठीशी उभा राहणारा, गुरू म्हणजे वाट दाखवणारा. आपल्यावर येणारं संकट झेलण्याची ताकत देणारा आणि हे सगळं न मागता देणारा म्हणजे गुरु,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
‘गेले दोन महिने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते. माझी आई हिची 5 तारखेला ओपन हार्ट सर्जरी करण्याती आली. तिला कुठल्याही प्रकारचा अटॅक किंवा कसलाही जीवघेणा त्रास झाला नाही. मम्माची कंडिशन आम्हाला डिटेक्ट करता आली आणि त्यावर योग्य तो उपचार करता आला यात फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती. आयुष्यातील अत्यंत हादरवून टाकणाऱ्या घटनांमध्ये आपल्याला अचानक विश्वास सापडतो आणि तो मलाही सापडला. मी माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबाचे आभार मानू इच्छिते, जे माझ्यासोबत सावलीसारखे उभे होते, ज्यांनी मला मिठी मारली आणि मला जेवण भरवलं. तुम्ही सर्वजण देवदूत आहात. आई आता बरी होत आहे आणि प्रत्येक स्त्री ही खऱ्या अर्थाने ‘आयर्न लेडी’ आहे हे ती दाखवून देत आहे,’ असं लिहित तिने डॉक्टर आणि रुग्णालयाती स्टाफबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
या पोस्टमध्ये अमृताने चाहत्यांना एक मोलाचा सल्लासुद्धा दिला आहे. तिने लिहिलंय, ‘ही घटना घडल्यानंतर मी सर्व मुलांना आणि पालकांना सांगू इच्छिते की कृपया तुमच्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला किंवा त्याच्या आरोग्याला गृहित धरू नका. तीन वर्षांपूर्वी मी माझ्या अशाच एका महत्त्वाच्या व्यक्तीला गमावलं होतं. माझ्या आईला कधी अर्धा दिवसही रुग्णालयात दाखल केलं नव्हतं किंवा तिला आतापर्यंत कोणतीही आरोग्याची समस्या उद्भवली नव्हती. आता तिच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे कृपया आरोग्याची नियमित तपासणी करून घ्या. आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. देव तुम्हा सर्वांचं कल्याण करो.’