ठाकरे की फडणवीस? मनातला ‘नायक’ कोण? औरंगाबादेत अनिल कपूरने उत्तर दिलं
आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मला खऱ्या आयुष्यातील 'नायक' दिसतो. आगामी काळात देशातील राजकारणाला अशाच 'नायकां'ची गरज आहे, अशी अपेक्षा अनिल कपूरने व्यक्त केली.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देण्याबाबत शिवसेना आधी आग्रही दिसत होती, मात्र हा हट्ट शिवसेनेने तूर्तास सोडलेला दिसत आहे. अशातच चित्रपटामध्ये ‘एक दिन का सीएम’ झालेल्या अनिल कपूरने आपल्या मनातला खराखुरा नायक कोण आहे, हे सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या दोघांचंही अनिल कपूरने (Anil Kapoor’s Favorite for Chief Minister) भरभरुन कौतुक केलं.
औरंगाबादमध्ये एका शोरुमच्या उद्घाटनासाठी आलेल्या अनिल कपूरने पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्यामुळे पत्रकारांनीही त्याला राजकारणाविषयी छेडलं. अनिल कपूरच्या ‘नायक’ चित्रपटाचा दुवा जोडत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खराखुरा ‘नायक’ कोण वाटतो? असा प्रश्न अनिल कपूरला विचारण्यात आला.
अनिल कपूरने उत्तर देताना देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मला खऱ्या आयुष्यातील ‘नायक’ दिसतो. दोघेही तरुण आहेत, तडफदार आहेत, अभ्यासू आहेत. आगामी काळात देशातील राजकारणाला अशाच ‘नायकां’ची गरज आहे.’ अशी अपेक्षा अनिल कपूरने (Anil Kapoor’s Favorite for Chief Minister) व्यक्त केली.
आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य मिळेल : तेजस ठाकरे
बाळासाहेबांपासून माझे ठाकरे कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडवीस यांच्याशीही आपला चांगला परिचय आहे. त्यामुळे हे दोघंही महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील असा मला विश्वास आहे.’ अशा भावना अनिल कपूरने व्यक्त केल्या.
‘उच्चशिक्षित व्यक्ती, तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. अभ्यासू आणि तरुण राजकारणी देशाची परिस्थिती सुधारु शकतात’ असं मत अनिल कपूरने व्यक्त केलं.
युती हा चर्चेचा मुद्दा नाही. युवकांनी सरकार चालवावं, असं मला वाटतं. तरुणांमध्ये प्रचंड उर्जा असते. आताची पिढी संवेदनशील आहे, तितकीच आक्रमकही आहे. त्यांनी राजकारणात येऊन काम करावं’ अशी इच्छा अनिल कपूरने व्यक्त केली.
मी कुठेही गेलो तरी माझ्या ‘नायक’ चित्रपटाची चर्चा होते. हा सिनेमा अनेक राजकीय नेत्यांनीही पाहिला आहे. मी अनेक मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. नायक चित्रपट पाहिल्याचं आणि आवडल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. नायक पाहून आम्ही प्रभावित झाल्याचं जेव्हा एखादा राजकारणी सांगतो, तेव्हा बरं वाटतं’ असं अनिल कपूर म्हणाला.
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नायक’ चित्रपटात अभिनेते अमरिश पुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. मुलाखत घेणारा पत्रकार त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारतो, तेव्हा तूच एक दिवसाचा मुख्यमंत्री का होत नाहीस? असं चॅलेंज ते देतात. हे आव्हान स्वीकारणारा अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, असं या चित्रपटाचं कथानक आहे.