मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री रुपाली गांगुली ही 2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. रुपाली ही चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी आहे. मात्र तिलाही सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुपालीने तिचा अनुभव सांगितला. कास्टिंग काऊचमुळेच काही चित्रपटांमधून माघार घेतल्याचं तिने स्पष्ट केलं.
“इंडस्ट्रीत त्याकाळी कास्टिंग काऊच होतंच. कदाचित काही लोकांना तो अनुभव आला नसावा, पण माझ्यासारख्या कलाकारांना त्याचा सामना करावा लागला होता. मात्र त्याला बळी न पडण्याचा निर्णय माझा होता”, असं तिने सांगितलं. यावेळी रुपाली तिच्या करिअरविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. फिल्म इंडस्ट्रीची पार्श्वभूमी असतानाही टेलिव्हिजनवर काम करत राहिल्याने कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींकडून ‘अपयशी’ असल्याचा ठपका मिळाल्याचं ती म्हणाली. “त्यावेळी मी फार छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. पण आता मला स्वत:वर अभिमान वाटतो. माझ्या अनुपमा या मालिकेनं मला ती प्रसिद्धी, लोकप्रियता दिली ज्याचं स्वप्न मी पाहत आले होते”, अशा शब्दांत रुपालीने भावना व्यक्त केल्या.
2000 च्या सुरुवातीला स्टार प्लस वाहिनीवरील ‘संजीवनी’ या मालिकेत रुपालीने नकारात्मक भूमिका साकारली होती. मात्र ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत मोनिषा साराभाईची भूमिका साकारल्यानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर रुपालीने काही काळ ब्रेक घेतला. 2020 पासून ती ‘अनुपमा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
अनुपमा या मालिकेत काम करण्यापूर्वी रुपालीने तब्बल 7 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला होता. याविषयी ती एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मी स्वतःसाठीच असा लांब ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मला काम मिळत नव्हतं म्हणून नाही. पण मीच घरी बसण्याचा विचार केला होता. माझं स्वप्न होतं की लग्न करावं आणि एका बाळाची मी आई व्हावी. आई होताना मला बर्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. पण, जेव्हा मी आई बनले, तेव्हा मला आयुष्यापासून इतर कशाचीही अपेक्षा नव्हती. जर मला असा एक उत्कृष्ट शो ऑफर झाला नसता, तर हा 7 वर्षाचा ब्रेक आणखी बराच काळ लांबला असता.”