मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : रविवारी संपूर्ण देशभरात जल्लोषाचा माहौल पाहायला मिळाला. केएल राहुल आणि विराट कोहली यांची झुंजार बॅटिंग आणि त्यापूर्वी रवींद्र जडेजाने केलेली बॉलिंग याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी आणि 52 चेंडू राखून नमवलं. भारताच्या या विजयात विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. म्हणूनच देशभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विजयाबद्दल विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आयसीसीची एक पोस्ट शेअर केली आहे. आयसीसीच्या या पोस्टमध्ये विराट कोहलीसोबत केएल राहुल पाहायला मिळतोय. या दोघांचा फोटो शेअर करत अनुष्काने निळ्या रंगाचा हृदयाचा इमोजी त्यावर पोस्ट केला आहे. अनुष्कासोबतच सोशल मीडियावर असंख्य क्रिकेटप्रेमी विराट कोहली आणि टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत.
भारताने सुरुवातीच्या दोन ओव्हर्समध्ये इशान किशन, कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर असे आघाडीचे तीन फलंदाज गमावले. हे तिघंही खातं न उघडता बाद झाले. त्यावेळी आव्हानात्मक स्थितीत विराट कोहली आणि केएल राहुल यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं. दोघांनी 164 धावांची अप्रतिम भागीदारी रचली. त्यामुळे भारताने 200 धावांचं आव्हान 41.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. विराट आणि राहुलने एक-दोन धावांवर भर दिला. तर दोघांनी मिळून 14 चौकार आणि दोन षटकार मारले.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं 199 धावांवर पॅकअप केलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने 46 आणि डेव्हिड वॉर्नर याने 41 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेन याने 27 आणि अखेरच्या क्षणी मिचेल स्टार्क याने 28 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना टीम इंडियाच्या गोलंदाजांना हात खोलण्यापासून रोखलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.