मुंबई : अभिनेता अर्शद वारसी सध्या ‘असुर 2’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. पहिल्या सिझनप्रमाणेच त्याच्या या सीरिजच्या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अर्शदच्या दमदार अभिनयाचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याची ‘सर्किट’ ही भूमिका मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी पहायला मिळेल याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अर्शदने ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटांमध्ये सर्किटची भूमिका साकारली होती. सर्किट आणि मुन्नाभाईच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. या पात्रांवरील भन्नाट मीम्स आजही व्हायरल होतात. गेल्या काही काळापासून ‘मुन्नाभाई 3’विषयी विविध अपडेट्स समोर येत आहेत. त्याविषयी आता अर्शदने धक्कादायक खुलासा केला आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अर्शदने ‘मुन्नाभाई 3’बद्दल असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची निराशा होऊ शकते. ‘मुन्नाभाई 3 हा चित्रपट कदाचित प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकत नाही’, असं तो म्हणाला. याविषयी त्याने सांगितलं, “ही सर्वांत विचित्र गोष्ट आहे. आमच्याकडे दिग्दर्शक आहेत, निर्माते तयार आहेत, प्रेक्षकसुद्धा आहेत, इतकंच काय तर चित्रपटात अभिनय करण्यासाठी अभिनेतेसुद्धा तयार आहेत. मात्र तरीसुद्धा या चित्रपटाबद्दल अजून काहीच प्रगती नाही.”
‘मुन्नाभाई 3’साठी इतका वेळ का लागतोय असा प्रश्न विचारला असता अर्शद पुढे म्हणाला, “राजू हिरानी हे परफेक्शनिस्ट आहेत. त्यांच्याकडे सध्या तीन स्क्रिप्ट आहेत आणि तिन्ही स्क्रिप्ट दमदार आहेत. मात्र त्यात छोट्यामोठ्या चुका आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते स्क्रिप्टच्या बाबतीत 100-200 टक्के तयार होत नाहीत, तोपर्यंत ते पुढील काम करणार नाहीत. तुम्ही जर त्यांना विचारलंत तर ते नेहमी हो असंच म्हणतीत, नाही म्हणणार नाहीत. ते म्हणतील, मी त्यावर काम करतोय, स्क्रिप्टमध्ये मला हे पसंत नाही, ते पसंत नाही. स्क्रिप्ट तयार झाली की लगेच पुढचं काम करू. हा टप्पा त्यांनी पार केला, तरच चित्रपटाचं शूटिंग शक्य आहे.”
2003 मध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये संजय दत्तने मुन्नाभाई आणि अर्शद वारसीने सर्किटची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2006 मध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. म्हणूनच प्रेक्षक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.