शूटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकांवर गुंडांचा हल्ला
शुटींग सुरु असतानाच अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर येथे माही गिलची प्रमुख भूमिका असलेल्या फिक्सर या वेबसिरिजचे शुटींग सुरु होती.
ठाणे: शूटिंग सुरु असतानाच अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर येथे माही गिलची प्रमुख भूमिका असलेल्या “फिक्सर” या वेबसीरिजचे शूटिंग सुरु होती. यावेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनीही मदतीऐवजी त्रासच दिल्याची तक्रार अभिनेत्री माही गिल आणि दिग्दर्शकांनी केली आहे.
या हल्लात माही गिल थोडक्यात बचावल्या, मात्र शूटिंगच्या स्टाफपैकी काहीजण जखमी झाले आहेत. तसेच शुटिंगच्या साहित्याचीही मोठी तोडफोड झाली. हा सर्व प्रकार झाल्यावर पोलीस घडनास्थळी आले. मात्र, पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी वेबसीरिजच्या शूटिंगचेच सामान जप्त केले. तसेच 50 हजार रुपये देऊन कासटवाडी पोलीस स्टेशन येथून घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांच्या या कृतीवर माही गिलसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
हल्लेखोरांनी कोणतीही चर्चा न करता त्यांच्या परवानगीशिवाय शूटिंग करता येणार नाही, असे सांगितले. त्यांनी महिला कलाकारांनाही वाईट पद्धतीने धक्काबूक्की केली. त्यांच्या मारहाणीत काही स्टाफ गंभीर जखमी झाल्याचीही तक्रार दिग्दर्शकांनी केली. माही गिल यांनीही आपल्यावर हल्ला झाला, मात्र आपण गाडीत गेल्याने बचावल्याचे सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास आरोपींवर मोक्का लागणार
हल्ल्याच्या घटनेनंतर अभिनेत्री माही गिल आणि दिग्दर्शकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला. तसेच हल्ल्याच्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्यास त्यांच्यावर मोक्का लावण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. कासारवडवली पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कृष्णा सोनार, सोनू दास, सुरज शर्मा, अशी आरोपींची नावे आहेत.