मुंबई : ‘बाप हा बाप असतो आणि आई ही आई असते’, हे शब्द अनेकदा कानावर पडत असतात. मात्र आई-बापाची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही हे देखील तितकंच जगमान्य सत्य आहे. नात्यांमध्ये कधी-कधी खटका उडतो, कधी दु:ख वाटेला येतं मात्र नात्यांमधील आनंद कायम टिकवून ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन, हेवेदावे बाजूला ठेवून नाती जपावी लागतात आणि मुख्य म्हणजे नात्यात संवाद असावा लागतो. असा सुंदर संदेश देणारा नवा कोरा मराठी सिनेमा ‘अवांछित’ येत्या 19 मार्चला झीप्लेक्स वर तुमच्या भेटीला येतोय.
शुभो बासु नाग दिग्दर्शित ‘अवांछित’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा यांच्या ‘फॅटफिश एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि शुभो बासु नाग दिग्दर्शित ‘अवांछित’ सिनेमाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची कथा वडील-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. दोघांचे भिन्न स्वभाव, एकमेंकांविरोधी मतं असणाऱ्या वडील-मुलाची भूमिका अभिनेते किशोर कदम आणि अभय महाजन यांनी साकारली आहे.
‘हे’ कलाकार गाजवणार सिनेमा
सोबतच मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण आणि राजेश शिंदे हे देखील या सिनेमाचा भाग आहेत. सिनेमाला अनुपम रॉय यांचे संगीत लाभले असून गाण्यांचे बोल ओमकार कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये झालं चित्रिकरण, बंगाली कलाकारही झळकणार
सिनेमा जरी मराठी असला तरी सिनेमातील लोकेशन्स पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलकत्यातील राहणीमान, संस्कृती मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहेच, पण त्यासोबत या नवीन आशय असलेल्या सिनेमात बंगाली कलाकार बरुन चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर यांचा अभिनय पाहण्याची संधी देखील मिळणार आहे.
येत्या 19 मार्चला होणार प्रदर्शित
अनोखी कथा, उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन, संगीत आणि थेट मनाला भिडतील असे संवाद घेऊन ‘अवांछित’ येतोय 19 मार्चला झीप्लेक्सच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या भेटीला.
संबंधित बातम्या
Marathi Serial : ‘तुमच्या लाडक्या कलाकारांनी स्विकारलं सोशल मीडियावरील चॅलेंज’, पाहा व्हिडीओ