कोरोना महामारी (Covid 19) आणि लॉकडाऊनचा सर्वांत मोठा फटका मनोरंजनविश्वाला बसला. प्रेक्षकांना पुन्हा थिएटरपर्यंत खेचून आणणं हे कलाकारांसमोर आणि दिग्दर्शकांसमोर मोठं आव्हान ठरलं. कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या बऱ्याच बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागला. मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. अशातच आता अभिनेता आयुषमान खुरानाने (Ayushmann Khurrana) महत्त्वाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
‘अनेक’ आणि ‘चंदीगड करे आशिकी’ हे दोन आयुषमानचे चित्रपट अपेक्षित कमाई करू शकले नाहीत. लागोपाठ दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आयुषमानने मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय. ‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने चित्रपटाच्या मानधनात कपात केल्याचं समजतंय.
आयुषमान त्याच्या एका चित्रपटासाठी 25 कोटी रुपये साइनिंग फी म्हणून स्वीकारायचा. मात्र आता त्याने ही रक्कम कमी केल्याचं म्हटलं जातंय. आता आयुषमान त्याच्या एका चित्रपटासाठी 25 नव्हे तर 15 कोटी रुपये मानधन घेणार आहे. उर्वरित 10 कोटी रुपये तो चित्रपटाच्या नफ्यातील काही भाग म्हणून स्वीकारणार आहे.
अशा परिस्थितीत जर त्याचा चित्रपट हिट ठरला, तर तो आधीपेक्षाही जास्त कमाई करू शकेल. मात्र जर तो फ्लॉप ठरला, तर आयुषमानला 15 कोटी रुपयांवरच समाधान मानावं लागेल.
“मोठ्या चित्रपटांच्या बाबतीत अशीच युक्ती लढवली जाते. पैसे वाचवण्याची ही चांगली पद्धत आहे. जेव्हा एखादा चित्रपट हिट होतो, तेव्हा कलाकाराला जास्त पैसे कमावण्याची संधी मिळते. हा पर्याय सर्वांसाठीच फायदेशीर आहे”, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयुषमान लवकरच ‘डॉक्टर जी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराग कश्यपची बहीण अनुभूती या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. दिग्दर्शिका म्हणून हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. यामध्ये आयुषमान गायनोकोलॉजिस्टची भूमिका साकारणार आहे.
आयुषमानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये चौकटीबाहेरचे विषय आणि भूमिका स्वीकारल्या आहेत. ‘शुभमंगल सावधान’, ‘बधाई हो’, ‘ड्रीम गर्ल’, ‘बाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.