Bigg Boss 13 : 26 दिवसांसाठी सलमानला तब्बल 403 कोटी
कलर्स टीव्ही वाहिनीवरील सर्वात प्रसिद्ध शो बिग बॉस सीजन 13 साठी प्रेक्षक वर्गात अनेक चर्चा सुरु आहेत, तसेच या सीजनमध्ये कोण कलाकार सहभागी होणार यासाठीही प्रेक्षक उत्साहीत आहेत.
मुंबई : कलर्स टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो बिग बॉस- 13 साठी (Bigg Boss 13) प्रेक्षकात अनेक चर्चा सुरु आहेत. बिग बॉसच्या येत्या हंगामात कोण कोण कलाकार सहभागी होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्या बिग बॉस 13 मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावं, लोकेशन, थीम याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. लवकरच बिग बॉस सीजन 13 सुरु होणार आहे. या नव्या सीजनमध्येही अभिनेता सलमान खान होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खानला बिग बॉस होस्ट करण्यासाठी मोठी रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम गेल्या सीजनपेक्षाही अधिक आहे.
सलमान खानला यंदा बिग बॉस सीजन 13 होस्ट करण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर करण्यात आलेली आहे. बिग बॉस सीजन 13 साठी प्रत्येक विकेंड म्हणजे दोन एपिसोडसाठी सलमानला 31 कोटी रुपये दिले जाणार आहेत. शोमध्ये एकूण 13 विकेंड आहेत. यानुसार सलमानला बिग बॉसच्या 13 आठवड्यातील 26 दिवसांसाठी एकूण 403 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
गेल्यावर्षीच्या सीजनमध्ये सलमान खानला विकेंडच्या एका एपिसोडसाठी 12 ते 14 कोटी रुपये दिले होते. तर सीजन 11 मध्ये सलमानला एका एपिसोडसाठी 11 कोटी रुपये दिले होते. यानुसार सलमान खानला सीजन 11 आणि 12 मध्ये 300 ते 350 कोटी रुपये दिले होते.
बिग बॉस सीजन 4 आणि 6 साठीही सलमान खानला एका एपिसोडसाठी 2.5 कोटी रुपये दिले होते. यानंतर सीजन 7 मध्ये ही रक्कम वाढवून 5 कोटी केली होती. यानंतर सीजन 8 साठी सलमान खानला 5.5 कोटी रुपये दिले होते. सीजन 9 मध्ये एका एपिसोडसाठी सलमानला 8 कोटी रुपये मिळाले होते. सीजन 10 साठी सलमानला 8 कोटीपेक्षा अधिक रुपये दिले होते.