Bigg Boss 17 : बिग बॉस सीझन 17 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. सर्व स्पर्धकांना मागे टाकत मुनव्वर फारूकीने विजेतेपद मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र या शोची एक स्पर्धक आणि संभाव्य विजेती म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडेकडे बघितलं जात होतं. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैन सोबत ऑक्टोबरमध्ये बिग बॉसच्या घरात आली. तिथे त्यांचं प्रेम तर दिसलं पण त्यापेक्षाही जास्त दिसले ते त्यांचे वाद, भांडणं. काही वेळा ती भांडणं इतकी टोकाला पोहोचली की अंकिताने रागाच्या भरात विकीला सांगितलं की त्याच्याशी बोलणार नाही. तर कधी त्यांचं नातं तुटतंय की काय, अशीही परस्थिती निर्माण झाली. मात्र, आता बिग बॉस शो संपला आहे. आणि यासोबतच या कपलमधील भांडणही संपुष्टात आले आहे.
अंकिता लोखंडे या शोच्या अंतिम फेरीत तर पोहोचली पण ट्रॉफी जिंकण्यात तिला यश आले नाही. तिचा पती विकी जैन तर फिनालेपूर्वीच बाहेर पडला होता. त्याच्या हकालपट्टीनंतर विकी त्याची पत्नी अंकिताला सतत साथ देत होता. आता शो संपला आहे, आणि अंकिता ट्रॉफी जिंकू शकली नाही, तरी विकी जैनने अंकितासाठी एक पोस्ट लिहिली आहे.शोमध्ये अंकिताशी भांडणाऱ्या विकीचे सूर बरेच बदलले आहेत. त्याने अंकितासोबतचे त्याचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.
काय म्हणाला विकी..
“अंकिता, तू जैन आणि लोखंडे कुटुंबावा अभिमान वाटेल असं वागलीस! तू ज्या प्रकारे खेळ खेळलीस, हार मानली नाहीस, तू सर्व गोष्टींमध्ये सर्वोत्तम होतीस आणि मला खात्री आहे की तुझे सर्व चाहते, मित्र, प्रत्येकाला तुझा अभिमान वाटत असेल ” अशी कॅप्शन लिहीत विकीने अंकितासोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.
फिनालेमध्ये कोण-कोण होतं ?
सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस सीझन 17 यंदा वाइल्ड कार्डसह 21 स्पर्धकांनी मध्ये भाग घेतला होता. हा शो 107 दिवस चालला. यावेळी शोच्या फिनालेमध्ये मुनवर फारुकी, अंकिता लोखंडे, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा पोहोचले होते. या पाच अंतिम स्पर्धकांना मागे टाकत मुनव्वरने ट्रॉफी जिंकली. अंकिता लोखंडे या वेळी विजयाची मोठी दावेदार मानली जात होती. पण ती शोमध्ये चौथ्या स्थानावर राहिली. फिनालेमध्ये तिची हकालपट्टी झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
अंकिता आणि विकी जैन यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले. त्याच्या लग्नाला अनेक टीव्ही स्टार्स उपस्थित होते. विशेष म्हणजे अंकिता आणि विकीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा लग्न केले. दुसऱ्यांदा त्यांनी युरोपमध्ये लग्न केले. स्वत: अंकिताने तिच्या लग्नाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.