कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन; स्वेटर्स आणि ब्लँकेटस खरेदी करण्यासाठी दिलजित दोसांझकडून 1 कोटीची देणगी
दिलजित दोसांझ पुन्हा एकदा त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत आला आहे. | Diljit Dosanjh
नवी दिल्ली: पंजाबी गायक व अभिनेता दिलजित दोसांझ हा गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौतसोबतच्या ट्विटर वॉरमुळे प्रचंड चर्चेत आहे. शेतकऱ्यांविषयी खोटी माहिती पसरवणाऱ्या कंगनाला दिलजित दोसांझने सडेतोड भाषेत उत्तर दिल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले होते. त्यानंतर दिलजित दोसांझ पुन्हा एकदा त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत आला आहे. (Diljit Dosanjh donated 1 crore rupees to farmers)
दिलजित दोसांझ याने कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या शेतकऱ्यांना थंडीपासून संरक्षण करणारे कपडे उपलब्ध व्हावेत म्हणून दिलजित दोसांझने हे पैसे दिल्याचे समजते. सिंघू बॉर्डरवर अनेक वृद्ध शेतकरी कडाक्याची थंडी असतानाही ठिय्या मांडून बसले आहेत.
आठ दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकरी आणि केंद्र सरकारची एकही चर्चा सफल होताना दिसत नाही. आता पुढची बैठक 9 डिसेंबरला होणार आहे. तेव्हाही केंद्र सरकार या सगळ्यावर समाधानकारक तोडगा काढले की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन दिलजित दोसांझने कडाक्याच्या थंडीपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना उब देणारे कपडे आणि ब्लँकेटस देण्याचा निर्णय घेतला. हे कपडे खरेदी करण्यासाठी दिलजित दोसांझने 1 कोटी रुपये देऊ केले आहेत. विशेष म्हणजे दिलजितने याबद्दल स्वत:हून सांगितले नाही. पंजाबी गायक सिंघा याने शेतकऱ्यांसमोर झालेल्या कार्यक्रमात हा खुलासा केला. या मदतीसाठी त्याने दिलजितचे आभारही मानले.
#WATCH Delhi: Punjabi singers perform at Singhu border to express solidarity with protesting farmers. Several singers including Diljit Dosanjh, Gurshabad Singh Kular & Harf Cheema were seen.
“We’re boosting the morale of farmers through our songs.,“ says singer Gurshabad S Kular pic.twitter.com/NPH6NaxIpd
— ANI (@ANI) December 5, 2020
शेतकरी आंदोलनावरुन कंगना रानौत आणि दिलजित दोसांझमध्ये ट्विटर वॉर
काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती.
त्यावर कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली. तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले. तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रानौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली.
कंगनाच्या या ट्विटला दिलजित दोसांझ यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. तू आजपर्यंत जितक्या जणांबरोबर चित्रपट केलेस, त्यांची तू पाळीव आहेस का? मग तर ही यादी वाढतच जाईल. आम्ही बॉलिवूडवाले नाही तर पंजाबवाले आहोत. खोटं बोलून लोकांना चिथवणे आणि भावनांशी खेळणे तुला चांगले जमते, असे दिलजितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
संबंधित बातम्या:
Kangana Ranaut : पंजाबच्या रस्त्यांवर कंगनाची शस्त्रक्रिया, व्हायरल फोटो बघून तुम्हालाही येईल हसू
(Diljit Dosanjh donated 1 crore rupees to farmers)