सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली, मुंबई पोलिसांनी दिल्या तीन महत्त्वाच्या अपडेट
मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आता नुकतंच पोलिसांना आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.
Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण 15 टीम कार्यरत आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सैफच्या इमारतीची तपासणी केली जात आहे. आता नुकतंच डीसीपी दीक्षित गेडाम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी तीन महत्त्वाच्या अपडेट दिल्या आहेत.
पोलिसांनी दिल्या तीन महत्त्वाच्या अपडेट
काल रात्री अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यात १० वेगवेगळ्या टीम तपास करत आहेत. यात एक आरोपी हा सैफ अली खानच्या घरी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. हा आरोपी आप्तकालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या मार्गाने त्याच्या घरात पोहोचला, अशी माहितीही समोर आली आहे, असे डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले.
आमच्या आतापर्यंतच्या तपासात चोरी करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपीला अटक झाल्यानंतर आम्ही या घटनेची सविस्तर माहिती तुम्हाला देऊ, अशी माहिती डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिली.
जिन्यांवरुन १२ व्या मजल्यावर गेला- पोलीस तपासात माहिती उघड
यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. तो जिन्यांवरुन १२ व्या मजल्यावर गेला अशी माहिती समोर आली आहे. या आरोपीला अटक करण्यासाठी सध्या टीम कार्यरत आहे. याबद्दल वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी म्हटले.
प्राथमिकदृष्ट्या या आताच्या तपासात असे निष्पन्न झाले की या आरोपीने चोरीच्या उद्देषाने सैफ अली खानच्या घरी प्रवेश केला आहे. सध्या आम्ही आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपीला लवकरात लवकर अट करण्यात येईल. यानंतर तपासात काही गोष्टी निष्पन्न होतील आणि त्याबद्दलची माहिती देण्यात येईल, असेही डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले.