बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत असून त्यानिमित्त विविध मुलाखती देत आहे. या मुलाखतींमध्ये तो आपले विचार स्पष्टपणे मांडताना दिसत आहे. अनेकांनी आमिरच्या जुन्या वक्तव्यावरून या चित्रपटावर बहिष्टार (Boycott) टाकण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर हा ट्रेंड सुरू आहे, ज्यावर आता आमिर खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे. याआधीही आमिरने प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटावर बहिष्टार न टाकण्याची विनंती केली होती. आता दिल्लीत एका मुलाखतीदरम्यान आमिर म्हणाला, “मला कोणाचंही मन दुखवायचं नाही.”
“ज्यांना माझा चित्रपट पाहायचा नाहीये, त्यांच्या शब्दांचा आणि भावनांचा मी आदर करतो. मी पुढे आणखी काय बोलू? पण, मला हे नक्की सांगायचं आहे की चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोकांची मेहनत लागते. माझ्याशिवाय या चित्रपटात इतरही कलाकार आहे, ज्यांनी खूप मेहनत केली आहे. एखादा चित्रपट हा शेकडो लोकांच्या मेहनतीने बनतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी माझा चित्रपट पाहावा अशी मला आशा आहे. हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल,” अशी प्रतिक्रिया आमिरने दिली.
आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटातून आमिर बऱ्याच काळानंतर पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य देखील दिसणार आहेत. नागा चैतन्य या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.