मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याचा भाचा इम्रान खानच्या आयुष्यात सध्या चांगलं चाललेलं नाही. मामाप्रमाणेच इम्रान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. इम्रान आणि त्यांची पत्नी अवंतिका मलिक आता वेगळे झाले आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांवरही शिक्कामोर्तब केले जात आहे. काही वर्षांपासून दोघांमध्ये काही चांगले चालले नव्हते, त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
इम्रान खानच्या पत्नीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती आपल्या पतीपासून विभक्त झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर, अवंतिकाने इंस्टाग्राम स्टोरीवर मायली सायरसचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं आहे की, ‘तिच्यासाठी घटस्फोट हा सर्वोत्तम होता’, यानंतर तिनं असंही लिहिलं की, ‘मी फक्त हे सांगत आहे.’
ही पोस्ट समोर येताच इम्रान आणि अवंतिका यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरलाय. सत्य काय आहे हे कोणालाही माहीत नसले तरी असं म्हटलं जातं की, अवंतिकाने इम्रानला लग्न वाचवण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. जानेवारी 2021 मध्ये, इम्रान खानचे दाक्षिणात्य अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे तो अवंतिका मलिकपासून दुरावला होता.
इम्रान आणि अवंतिका यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या तीन वर्षांनंतर ते दोघेही एका गोड मुलीचे इमाराचे आई-वडील झाले होते. पण काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अवंतिका खूप पूर्वी इम्रानचे घर सोडून गेली होती आणि आता ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
अवंतिकाने 2020 मध्ये इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिनं इम्रानपासून विभक्त झाल्याची माहिती दिली होती. तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणं कठीण आहे. संवाद करणं कठीण आहे. संवाद न करणं अधिक कठीण आहे. जीवन कधीच सोपे नसते, परंतु कोणते कठीण जीवन निवडायचे हे आपण ठरवू शकतो.