बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा फक्त देशातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यासाठी तयार होतात. आता न्यूजर्सीमधल्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या घराबाहेर बिग बींचा मोठा पुतळा (statue) उभारला आहे. या पुतळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘शनिवारी, 27 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांचा पुतळा आम्ही आमच्या एडिसन इथल्या नव्या घराबाहेर उभारला आहे. या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बिग बींचे (Big B) अनेक चाहते उपस्थित होते’, अशी पोस्ट गोपी शेठ यांनी लिहिली आहे. त्यासोबतच उद्घाटन समारंभाचे फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
बिग बींच्या पुतळ्याविषयी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी आणि माझ्या पत्नीसाठी बिग बी देवासमान आहेत. त्यांच्याबद्दल मला प्रेरणा देणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फक्त त्यांचं रिल लाइफच नाही तर त्यांचं वास्तविक जीवनसुद्धा आहे. ते ज्याप्रकारे लोकांसमोर असतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात.. ते खूपच विनम्र आहेत. ते त्यांच्या चाहत्यांची काळजी घेतात. ते इतर अनेक स्टार्ससारखे नाहीत. म्हणूनच मला माझ्या घराबाहेर त्यांचा पुतळा उभारण्याची कल्पना सुचली.”
????On Saturday august 27th we have placed @SrBachchan statue ????????at outside in the front of our new home in edison NJ USA . Lots of Mr Bachchan’s fan’s participated on Mr Bachchan’s staue inoguration ceremony. pic.twitter.com/O3RklFS5eZ
— Gopi EFamily (@GopiSheth) August 28, 2022
गोपी हे गुजरामधून 1990 मध्ये अमेरिकेला वास्तव्यास गेले. गेल्या तीन वर्षांपासून ते बिग बींसाठी एक वेबसाइट चालवत आहेत. या पुतळ्याविषयी अमिताभ बच्चन यांनासुद्धा कल्पना होती आणि इतका मोठा मान मिळवण्यास मी पात्र नाही, असं ते गोपी यांना म्हणाले. मात्र गोपी आपल्या निर्णयावर ठाम होते. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बिग बी ज्या पोझमध्ये बसतात, त्याच पोझमध्ये हा पुतळा बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये हा पुतळा बनवून अमेरिकेत पाठवला गेला. यासाठी गोपी यांना जवळपास 75 हजार डॉलर्स म्हणजेच 60 लाख रुपयांचा खर्च आला.