मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही अक्षरा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच अक्षराने बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी अक्षराने धीरेंद्र शास्त्री यांना भजन देखील म्हणून दाखवले आहे. सध्या अक्षराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
अक्षराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, ज्यांना ऐकायला संपूर्ण जग आतुर आहे, त्यांनीच आज मला ऐकलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. यासोबतच अक्षराने जय सीता रामचा हॅशटॅग लावला आहे तसंच बागेश्वर बाबा की जय असंही तिनं लिहिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री बिहार मधील पटना येथे आहेत. तिथे त्यांचा दिव्य दरबार सुरू आहे. पण पहिल्याच दिवशी त्यांच्या दरबारात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे तो दरबार रद्द करण्यात आला होता. तसंच तेथे सुरू असलेल्या हनुमान कथेचा आज चौथा दिवस आहे.
अक्षरा सिंह ही भोजपुरी सिने सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अक्षराने 2010 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सत्यमेव जयते या चित्रपटातून सुरुवात केली होती. त्यानंतर तिने साजन चले ससुलाल, एक बिहारी सौ पे भारी, दिलेर, प्रतिज्ञा 2, ए बलमा बिहार वाला, खून की होली एक प्रतिघात, साथिया यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच अक्षराचे चाहते लाखोंच्या संख्येत आहेत. सध्या तिचे इंस्टाग्रामवर 56 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.