बॉलीवूडमधल्या काही तारकांनी त्यांच्या सौंदर्याच्या जोरावर असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. या देखण्या तारकांच्या यादीतली काही नावे आवर्जून घ्यावी लागतात. काजोल (Kajol) ही त्यापैकीच एक. मनमोहक सौदर्य, चाहत्यांची नजर हटू न देणारे डोळे अन् घायाळ करणारी अदा अशा विविधांगी रुपाच्या जोरावर काजोलने चित्रपट रसिकांच्या ह्रदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडची बबली म्हणून अभिनेत्री काजोलची चांगली ओळख आहे. आज तिचा 48 वा वाढदिवस (Birthday) आहे. तिचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुंबईत झाला. काजोल ही ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि दिवंगत निर्माता-दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची मुलगी. घराणा या चित्रपटाशी संबंधित असलेल्या काजोलने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Film) दिले आहेत. इतकंच नव्हे तर काजोल एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच एक आदर्श मुलगी, पत्नी आणि आई आहे. आज काजोलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित खास गोष्टी…
काजोलने 1992 मध्ये आलेल्या बेखुदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी काजोलचा चित्रपटातील अभिनय लोकांना फार आवडला. याच चित्रपटातील उत्तम भूमिकेमुळे काजोलला शाहरुख आणि शिल्पा शेट्टीसोबत ‘बाजीगर’ चित्रपट करण्याची संधी मिळाली, जो चित्रपट हिट ठरला होता. काजोलने पहिला चित्रपट साईन केला, तेव्हा ती अवघ्या 16 वर्षांची होती. त्यावेळी ती शाळेत शिकत होती पण चित्रपटातील करिअरमुळे तिने तिचे शिक्षण मध्येच सोडले. एवढ्या कमी वयात तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले.
काजोलने सुपर हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनय कौशल्य आणि सुंदर रुपडे या जोरावर तिने मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली. आपल्या चित्रपट प्रवासात तिने ‘बाजीगर’, ‘करण अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘गुप्त’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले’ आणि ‘दिलवाले’ यासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. ‘तानाजी’ चित्रपटातील तिच्या अभिनयाने असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट शाहरुख-काजोलच्याच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटाशिवाय काजोलने “कुछ कुछ होता”, “कभी खुशी कभी गम”, “फना”, “माय नेम इज खान” या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जिंकला आहे. काजोलचा ‘गुप्त’ हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा नकारात्मक अर्थात व्हिलनची होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला होता. इतकेच नाही तर 2011 मध्ये काजोलला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
काजोलने अजय देवगणसोबत 1999 मध्ये लग्न केले. अजय देवगण आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडींपैकी एक असल्याचे म्हटले जाते. या दोन्ही कलाकारांची मुलगी न्यासा आणि मुलगा युग ही मुले आहेत. काजोल अजयला कशी भेटली आणि ती कशी प्रेमात पडली, याबाबत काजोलने एका संवादात सांगितले होते.
ती सांगते की 26 वर्षांपूर्वी मी ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर अजयला भेटले होते, तेव्हा मी शॉटसाठी रेडी झाले होते आणि मी विचारले की माझा हिरो कुठे आहे? कुणीतरी अजयकडे बोट दाखवून सांगितलं की तो पाहा! अजय एका कोपऱ्यात अस्ताव्यस्त बसला होता. आणि गंमत म्हणजे अजयला भेटण्याच्या 10 मिनिटे आधीपर्यंत मी त्याच्यावर टीका करत होते. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांशी बोलू लागलो आणि आमची मैत्री झाली. पुढे त्या मैत्रीचे लग्नात रुपांतर झाले आणि दोघे एकमेकांचे लाईफ पार्टनर बनलो. (Bollywood star actress Kajol’s 48th birthday today, lets know special things about her)