अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) आगामी ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारत असून चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे कंगनाने या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. टीझरमध्ये कंगना हुबेहूब इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसत असून तिच्या लूकचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. आणीबाणीला भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय मानलं जातं. हाच अध्याय कंगना तिच्या या चित्रपटातून उलगडणार आहे.
या टीझरमध्ये कंगनाला अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव हेन्री किसिंजर यांचा फोन येतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हे त्यांना सरऐवजी ‘मॅडम’ म्हणून संबोधू शकतात का, असा प्रश्न ते फोनवर विचारतात. त्यावर इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील कंगना हो म्हणते. पण नंतर सेक्रेटरीकडे वळते आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कळवायला सांगते की त्यांच्या कार्यालयातील प्रत्येकजण त्यांना ‘सर’ म्हणून संबोधतात. ‘प्रस्तुत करत आहोत त्यांना, ज्यांना सर म्हटलं जायचं’, असं कॅप्शन देत कंगनाने हा टीझर पोस्ट केला. इमर्जन्सी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं कंगनाने स्पष्ट केलं.
कंगना रनौत ते इंदिरा गांधी असा लूकमधील ट्रान्सफॉर्मेशन ऑस्कर-विजेता डेव्हिड मालिनॉस्की यांनी केला आहे. डेव्डिड यांनी डार्केस्ट अव्हर (2017), वर्ल्ड वॉर झेड (2013) आणि द बॅटमॅन (2022) यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. यापूर्वी कंगनाने 1975 मधील वर्तमानपत्राची क्लिपिंग शेअर केली होती आणि लिहिलं होतं, “जगाच्या इतिहासातील या सर्वात नाट्यमय घटना होत्या. आणीबाणी कशामुळे जाहीर झाली होती आणि त्याचे परिणाम काय झाले? या घडामोडींच्या मध्यभागी जगातील सर्वात शक्तिशाली महिला होती. या सर्व घटनांवर एक भव्य चित्रपट बनू शकतो. तर भेटुयात पुढच्या वर्षी.’ रितेश शाह लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन कंगना करत असून ती अभिनयसुद्धा करत आहे. यामध्ये इतर कोणकोणते कलाकार झळकतील त्याबद्दलची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.