मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवण्यासाठी ओळखला जातो. तो अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जे छोट्या बजेटच्या चित्रपटांना देखील मोठ्या स्तरावर नेऊ शकतात. आयुष्मान खुरानाचे असे अनेक कमी बजेटचे चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. आयुष्मान खुरानाचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी चंदीगडमध्ये झाला.
अभिनेत्याचे त्याचे वडील चंदीगडचे प्रसिद्ध ज्योतिषी पी. खुराना यांचे पुत्र आहेत. आयुष्मान खुरानाने आपले संपूर्ण शिक्षण चंदीगडमधूनच पूर्ण केले. इंग्रजी साहित्यात पदवी घेतल्यानंतर त्याने मास कम्युनिकेशनमध्ये एमए केले आहे. आयुष्मान खुरानाच्या वडिलांनी त्याला सुरुवातीपासूनच सर्जनशील गोष्टी करण्याची संधी दिली. ते स्वतः देखील रंगभूमीशीही संबंधित होते आणि पत्रकार म्हणून नोकरीही करत होते. आयुष्मान खुराना याने चंदीगडमध्ये ‘आगाझ’ आणि ‘मंचतंत्र’ नावाचे दोन नाट्यगट सुरू केले, जे अजूनही चंदीगडमध्ये सक्रिय आहेत.
आयुष्मान खुरानाने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. पहिल्यांदा तो टीव्हीवरील स्टंट रिअॅलिटी शो ‘एमटीव्ही रोडीज’ मध्ये झळकला होता. ‘एमटीव्ही रोडीज’चा सीझन 2 जिंकल्यानंतर आयुष्मानसाठी पुढील मार्ग हळूहळू खुला झाला. या दरम्याने त्याने रेडिओमध्येही काम करण्यास सुरुवात केली. यानंतर आयुष्मानने एमटीव्हीसह विविध वाहिन्यांवर शो होस्ट करायला सुरुवात केली आणि मग त्याचा चेहरा घरोघरी प्रसिद्ध झाला.
2012 हे आयुष्मान खुरानाच्या कारकीर्दीतील सर्वात खास वर्ष होते. यावर्षीच त्याचा पहिला चित्रपट ‘विकी डोनर’ प्रदर्शित झाला. आयुष्मान त्याच्या पहिल्या चित्रपटातूनच सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी त्याला खूप प्रेक्षक आणि समीक्षकांची दादही मिळाली. आयुष्मान खुरानाला ‘विकी डोनर’ साठी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तसेच त्याच्या ‘पानी दा रंग’ या गाण्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार मिळाला. यासह, त्याने ‘झी सिने अवॉर्ड’ ते ‘स्टारडस्ट अवॉर्ड’ वरही आपले नाव कोरले.
‘विकी डोनर’ नंतर आयुष्मान खुराना ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल 15’, ‘ड्रीम गर्ल’, ‘बाला’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला आहे. आयुष्मान खुरानाने सलग सात हिट चित्रपट दिले आहेत. तो नेहमीच पडद्यावर त्याच्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखला जातो. आयुष्मान खुराना चित्रपटांसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वीच आयुष्मानने 2011मध्ये ताहिरा कश्यपशी लग्न केले. लग्नाआधी दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. आता आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप हे दोन मुलांचे पालक आहेत.
‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात, दाढी-पगडीमध्ये स्पॉट झाला आमिर खान! पाहा खास लूक…
TMKOC | ‘बबिता जी’ फेम मुनमुन दत्तासोबत रिलेशनशिपची चर्चा, पाहा काय म्हणाला ‘टप्पू’?