“काश्मीरी पंडितांवर अन्याय ही तर भाजपची चूक”, हिंदू महासंघाने भाजपला फटकारलं!
"द काश्मीर फाईल्स सिनेमाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये", असं म्हणत हिंदू महासंघाने भाजपला फटकारलं आहे.
मुंबई : सध्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकाच सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे ती ‘द काश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files). एकीकडे काही राजकीय पक्ष या सिनेमाचं समर्थन करत आहेत. तर काहींनी याला विरोध दर्शवलाय. भाजपने या सिनेमाला पाठिंबा दर्शवलाय. या सिनेमाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेटही घेतली. हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर (Kashmiri pandit) झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. काल विधीमंडळ अधिवेशनादरम्यान भाजप आमदार प्रवीण दटके (Pravin Datake) यांनी “‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा”, अशी मागणीही केली. तर दुसरीकडे “द काश्मीर फाईल्स सिनेमाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये”, असं म्हणत हिंदू महासंघाने (Hindu Mahasangh) भाजपला फटकारलं आहे. “अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या 5 वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या 7 वर्षांच्या काळात भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं?”,असा सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी विचारला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
हिंदू महासंघाने भाजपला फटकारलं
‘द काश्मीर फाईल्स’सिनेमावरून हिंदू महासंघाने भाजपला फटकारलं आहे. “द काश्मीर फाईल्स सिनेमाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये.भाजपवाल्यांनो, खोटं-खोटं रडू नका. हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका.‘द काश्मीर फाईल्स’चं स्वागत करताय पण ही घटना घडली तेव्हा केंद्रात तुमचंच सरकार होतं, VP सिंग तुमच्याच पाठिंबावर पंतप्रधान होते. अतिरेक्यांना तुम्हीच परत सोडलं, तेही पैसे देऊन! ज्या राज्यपालांच्या देखरेखीखाली हे हत्याकांड घडलं त्या जगमोहन यांना तुम्हीच राज्यपाल बनवलं, हे आम्ही विसरलेलो नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या 5 वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या 7 वर्षांच्या काळात भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? काश्मीरी पंडितांवर अन्याय ही भाजपची चूक आहे, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय.
तर दुसरीकडे अॅड. असिम सरोदे यांनी या सिनेमाबाबत फेसबुक पोस्ट लिहित भाष्य केलंय. “काश्मीर फाईल्स ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे. असत्याला सत्याचे कपडे घालण्याचे प्रकार वाढले आहेत”, असं असिम सरोदे यांनी म्हटलंय.
‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करा, भाजपची मागणी
‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी विधीमंडळात करण्यात आली. “द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे.परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणिवपूर्वक आवाज बंद करणे,प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा”, अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली आहे.