मुंबई : अभिनेत्री जिया खानच्या (Jiah Khan) आत्महत्येप्रकरणी राबिया खान यांच्याकडून सुरूवातीपासूनच विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. जिया खानच्या आत्महत्येनंतर याप्रकरणाचा संपूर्ण तपास हा सीबीआयने केला आहे. मात्र, सीबीआयच्या तपासावर जिया खानची आई अर्थात राबिया खान (Rabia Khan) यांनी संशय व्यक्त केलाय. कारण जिया खानच्या आईचे म्हणणे आहे की, माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आलीये. मात्र, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक महत्वाचा आदेश 12 सप्टेंबर रोजी दिला.
जिया खानच्या आत्महत्येचा तपास अमेरिकेच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला (एफबीआय) द्यावा, अशी मागणी राबिया यांनी आपल्या याचिकेत केली होती. यांची सविस्तर प्रत न्यायालयाने मंगळवारी उपलब्ध करून दिलीये.
यामध्ये म्हटले आहे की, हे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे. एफबीआयला चौकशी करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत. यामुळे राबिया यांना अजून एक धक्का बसलाय. खंडपीठाचे असेही म्हणणे आहे की, सीबीआयने केलेल्या तपासावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे.
जिया खान 2013 मध्ये तिच्या मुंबईतील घरी मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर या प्रकरणी सूरज पांचोलीचे नाव पुढे आहे. जियाला सूरज पांचोलीचे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला. जिया खानच्या आत्महत्येनंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता.
राबिया या माझ्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सीबीआयने सर्व संभाव्य तपास केला आणि निष्कर्ष काढला की हे आत्महत्येचे प्रकरण आहे. सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. राबिया यांनी सूरजवर जियाला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय.