भुताटकीच्या अफवेतून चित्रपटाची कथा गवसली, ‘आयेगा आनेवाला’ने लता मंगेशकरांना ओळख मिळवून दिली!
‘महल’ या चित्रपटातील सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली होती. मात्र, त्यातील ‘आयेगा आनेवाला’ (Ayega Aanewala) गाणं केवळ काही शब्द नाहीत, तर तो एक इतिहास आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून देणारे हेच ते गाणे!
मुंबई : जुनी हिंदी चित्रपटगीते आपल्या तोंडात जेवढी रुळतात, तेवढीच ती लोकप्रिय देखील होतात. या गाण्यांच्या गोड चाली, आणि यांना आवाज दिलेल्या गायकांची गायन शैली यामुळे ही गाणी नेहमीच लक्षात राहतात. 40 आणि 50च्या दशकांमध्ये अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली गेली, ज्यांनी गाणी आजतागायत लोकप्रिय आहेत. या पैकीच एक कमाल अमरोही यांचा ‘महल’ (Mahal) चित्रपट होता.
‘महल’ या चित्रपटातील सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली होती. मात्र, त्यातील ‘आयेगा आनेवाला’ (Ayega Aanewala) गाणं केवळ काही शब्द नाहीत, तर तो एक इतिहास आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून देणारे हेच ते गाणे!
लता नावाचं सुरेल युग!
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1949 साली कमल अमरोही यांच्या ‘बॉम्बे टॉकिज’ या संस्थेच्या ‘महल’ चित्रपटासाठी हे शब्द गीतरूपानं ध्वनिमुद्रित झाले आणि भारतीय चित्रपट संगीतात लता नावाचं सुरेल युग सुरू झालं. 1947साली ‘आपकी सेवामें’ या चित्रपटातून लताजींचा सूर पार्श्वगायन क्षेत्रात प्रथम ऐकू आला होता. पण ‘आयेगा आनेवाला’ या गीतानं हा सूर आणखी चमकला आणि झळकला देखील! या गाण्याने लता मंगेशकर हे नाव अधिक चर्चेत आलं. रुपेरी पडद्यावरचं अलौकिक सौंदर्य म्हणून जिचा गौरव केला जातो त्याचा अभिनेत्री मधुबाला यांच्यावर हे गीत चित्रित करण्यात आलं होतं.
भुताटकीच्या अफवेतून तयार झाली चित्रपटाची कथा
मुंबईत मालाडस्थित ‘बाँबे टॉकिज’ स्टुडिओमध्ये त्याकाळात भुताटकीची अफवा पसरली होती. त्यातूनच कमाल अमरोहीना हे कथाबीज गवसलं. या कथेला पुनर्जन्माचं उपकथानक जोडून ‘महल’ हा रहस्यमय चित्रपट तयार झाला. जर्मन सिनेमोटोग्राफर योसेफ विरशिंग यांनी चित्रीकरणात छाया-प्रकाशाच्या अद्भुत खेळांनी या चित्रपटाला आणखी जिवंत बनवलं.
‘आयेगा आनेवाला’ या गीताआधी ‘खामोश है जमाना चुपचाप है सितारे’ अशा मुक्त ओळी आहेत, त्या खुद्द कमाल अमरोही यांनी लिहिल्या तर ‘आयेगा आनेवाला’ आणि पुढची दोन कडवी जे नक्षाब यांनी लिहिली. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी घरंदाज चालीत बांधलेल्या या गीताच्या ध्वनिमुद्रण प्रसंगाची आठवण लताजींनी सांगतली आहे.
कसं झालं या गाण्याचं रेकॉर्डिंग?
त्या काळी रेकॉर्डिंग तंत्र आजच्या सारखं प्रगत नव्हतं. लांबून येणाऱ्या आवाजाचा परिणाम साधण्यासाठी खेमचंद प्रकाश यांनी माईक रेकॉर्डिंग रूमच्या बरोबर मध्यभागी ठेवला आणि लताजींना दूरवर कोपऱ्यात उभं राहून एक एक ओळ गात हळू हळू माईकच्या दिशेनं पुढे यायला सांगितलं. त्यातून इच्छित परिणाम साधला गेला. ‘आयेगा आनेवाला’ गाण्याला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली.
गायिका बदलण्याचा प्रस्ताव
‘बाँबे टॉकिज’चे अजून एक निर्माते सावक वाच्छा यांना हे गीत संथ आणि मंद वाटलं. त्यांनी खेमचंद प्रकाशवर चाल आणि गायिका बदलण्यासाठी दबाव आणला. पण खेमचंद प्रकाश ठाम राहिले आणि नंतर इतिहास घडला. लता मंगेशकर यांच्या सुरांची पारख करणारे खेमचंद प्रकाश नामक जोहरी अल्पायुषी ठरले. लता मंगेशकरांचं उत्तुंग कर्तृत्त्व पाहण्या आधीच 1950मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.