एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) जवळपास दोन दशकांनंतर मनोरंजनविश्वात परततेय. मंदाकिनी एका म्युझिक व्हिडीओमध्ये तिच्या मुलासोबत झळकणार आहे. या व्हिडीओच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीबद्दल (nepotism) वक्तव्य केलं. त्याचसोबत सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या बॉयकॉट ट्रेंडबद्दलही ती व्यक्त झाली. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरा साथी’ या चित्रपटातून मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र राज कपूर (Raj Kapoor) यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या दुसऱ्या चित्रपटातून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मंदाकिनी म्हणाली, “मी या बॉयकॉट कल्चरला पाठिंबा देत नाही. कलाकार आणि तंत्रज्ञ एखादा चित्रपट बनवण्यासाठी खूपच मेहनत घेऊन काम करतात. लोकांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहावा. एक कलाकार हा नेहमीच कलाकार असतो. तो लोकांच्या मनोरंजनासाठी हे काम करतोय.”
इंडस्ट्रीतल्या घराणेशाहीबद्दल ती पुढे म्हणाली, “घराणेशाही ही सर्वसामान्य संकल्पना आहे. जेव्हा एखादा अभिनेता काम करतो, तेव्हा त्याचा मुलगा किंवा मुलगी ही त्याच वातावरणात लहानाची मोठी झालेली असते. त्यामुळे आपले पालक जे काम करतायत तेच काम आपणसुद्धा करावं हे मुलांना वाटणं खूपच साहजिक आहे. सेटवर किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ही मुलं त्यांच्या पालकांसोबत असतात. तेव्हा ते दिग्दर्शक, निर्माते आणि इतर अभिनेत्यांना भेटतात. त्यामुळे या वातावरणाशी प्रभावित होणं साहजिक आहे. पालकांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यात काहीच गैर नाही.”
मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये काही हिट चित्रपट दिले. मात्र 1990 च्या सुरुवातीला लग्नानंतर तिने कामातून ब्रेक घेतला. 1996 मध्ये ‘झोरदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तिचा ‘माँ ओ माँ’ हा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातून तिचा मुलगा रब्बिल ठाकूर पदार्पण करत आहे.