बॉलिवूडमधील वर्णद्वेष आणि घराणेशाही हे तसे जुने मुद्दे आहेत. या मुद्द्यांवर अनेक दशकांपासून चर्चा होत आहे. कंगना रणौतसारख्या (Kangana Ranaut) काही सेलिब्रिटींनी यावर खुलेपणानं आपलं मत मांडलं, तर काहींनी यावर मौन बाळगणं पसंत केलं. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) बॉलिवूडमधल्या वर्णभेदावर निशाणा साधला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजने स्पष्टपणे सांगितले की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म तर आहेच, पण त्याचसोबत वर्णभेदही आहे. या दोन गोष्टी म्हणजे बॉलिवूडचं काळं सत्य आहे, असं त्याने म्हटलंय. ‘एबीपी न्यूज’च्या एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना नवाजुद्दीन म्हणाला, “बॉलिवुडमध्ये वंशवाद आणि वर्णभेदही (Racism) आहे. मला एक अशी सावळी/काळी अभिनेत्री सांगा जी सुपरस्टार किंवा स्टार आहे.”
“मीसुद्धा एक अभिनेता आहे. सावळे लोक चांगला अभिनय करू शकत नाहीत का? मला एखादी अशी अभिनेत्री सांगा, जी सावळी असून सुपरस्टार आहे. मी माझ्यातील जिद्दमुळे स्टार झालो. माझ्यासारखी जिद्द अनेक अभिनेत्रींमध्ये आहे, पण आज मी ज्या स्थानी आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्यात अभिनयकौशल्यही त्या तोडीचं असावं लागतं”, असं तो म्हणाला.
यावेळी नवाजुद्दीनला विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाविषयीही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मी अद्याप ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिला नाही, पण मला वाटतं की मी ते पाहावं आणि नक्कीच पाहीन.” या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दोन गट पाडले का असा प्रश्न विचारण्यात आला असता तो पुढे म्हणाला, “मला हे माहीत नाही, पण प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची स्वतःची एक दृष्टी असते. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवला. जेव्हा एखादा दिग्दर्शक असे चित्रपट बनवतो, तेव्हा साहजिकच त्याने तथ्य तपासलेले असतात.”
या मुलाखतीत त्यांनी ओटीटी माध्यमावरही भाष्य केलं. “ओटीटीवर याआधी चांगले विषय हाताळले जायचे पण आता तसं होताना दिसत नाही. आम्ही आधी खूप दर्जेदार काम केलं पण आता स्टार या माध्यमावर येत आहेत. ते तेवढ्या दर्जाची कलाकृती निर्माण करत नाहीत याची खंत आहे”, असंही नवाज म्हणाला.
हेही वाचा:
“अनेकदा उपाशीपोटी झोपलो, बस तिकिटाचेही पैसे नव्हते”; The Kashmir File मधील अभिनेत्याचा संघर्ष
‘मी चुकलो..’; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर विल स्मिथचा जाहीर माफिनामा