ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांच्या निधनाच्या अफवा (death hoax) बुधवारी सकाळपासून सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. मात्र यावर आता खुद्द प्रेम चोप्रा यांनीच उत्तर दिलं आहे. मी जिवंत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी राकेश रोशन (Rakesh Roshan), आमोद मेहरा आणि इंडस्ट्रीतील इतरही कलाकारांचे मला फोन आले, असं ते म्हणाले. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना कोविडची लागण झाल्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या दोघांवर रुग्णालयात काही दिवस उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. “कोणीतरी लोकांना चुकीची माहिती देऊन आनंद मिळवत आहे. याला सेडिज्म (Sadism) नाहीतर दुसरं काय म्हणायचं? पण मी इथे तुमच्याशी बोलतोय आणि पूर्णपणे ठीक आहे”, असंही ते म्हणाले.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रेम चोप्रा म्हणाले, “मला सकाळपासून असे असंख्य फोन आलेत. राकेश रोशन यांनी मला फोन केला. आमोद मेहरा (ट्रेड अॅनालिस्ट) यांचाही फोन आला. माझ्यासोबत असं कोणी करू शकेल याचं मला आश्चर्य वाटतं. माझा जवळचा मित्र जितेंद्र यांच्यासोबतही कोणीतरी असंच केलं होतं. जवळपास चार महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. हे थांबवण्याची गरज आहे.” आमोद मेहरा यांनीसुद्धा त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिलं, “प्रेम चोप्रा यांना मृत घोषित करण्यात ज्यांना आनंद होत आहे त्यांनी कृपया लक्षात घ्या, मी नुकतंच त्यांच्याशी बोललो आणि ते अत्यंत आनंदी आणि ठीक आहेत. सर, जुग जुग जियो… तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.”
प्रेम चोप्रा यांनी 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. शहीद (1965), उपकार (1967), पूरब और पश्चिम, दो रास्ते (1969), कटी पतंग (1970), दो अंजाने (1976), जादू तोना (1977), काला सोना, दोस्ताना (1977), क्रांती (1981), जानवर (1982), फूल बने अंगारे (1991) यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. प्रेम चोप्रा यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत 19 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.