गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि व्यावसायिक ललित मोदी (Lalit Modi) यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचं नातं जाहीर करताच नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या दोघांना प्रचंड ट्रोलदेखील करण्यात आलं. सुष्मिताने पैसे बघून ललित यांना डेट करत आहे, अशीही टीका अनेकांकडून झाली. गोल्ड डिगरचा (gold diggers) ठपका लावणाऱ्यांना सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सडेतोड उत्तर दिलं. ‘मला ‘गोल्ड डिगर’ म्हणत आहेत. पण मी सोन्याच्याही पुढचा विचार करते आणि मी नेहमीच डायमंड्सना प्राधान्य दिलं आहे आणि हो.. ते मी स्वत: माझ्यासाठी खरेदी करते,’ असं लिहित तिने टीकाकारांचं तोंड बंद केलं. एखाद्या अभिनेत्रीवर ‘गोल्ड डिगर’ची टीका झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही बॉलिवूड आणि काही टॉलिवूड अभिनेत्रींवरही नेटकऱ्यांनी या प्रकारची टीका केली होती. वेळोवेळी या अभिनेत्रींनी अशा ट्रोलर्सना सडेतोड उत्तरदेखील दिलं आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घटस्फोट जाहीर केला. या घटस्फोटानंतर नेटकऱ्यांनी समंथाला प्रचंड ट्रोल केलं. समंथाने नाग चैतन्यकडे मोठ्या पोटगीची मागणी केल्याचीही टीका नेटकऱ्यांनी केली. ‘समंथा ही घटस्फोटित सेकंड हँड वस्तू आहे, जिने एका सज्जन व्यक्तीकडून 50 कोटी रुपये लुटले आहेत,’ असं एकाने सोशल मीडियावर लिहिलं होतं. संबंधित ट्रोलरला टॅग करत समांथाने लिहिलं, ‘देव तुला सदबुद्धी देवो.’
जून 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सोशल मीडियावर त्यांचं नातं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर तिला खूप ट्रोल केलं गेलं. गोल्ड डिगर म्हणत रियाने सुशांतकडून पैसे लुटल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला होता. सुशांतच्या पैशातून उदरनिर्वाह केल्याची टीका युजर्सनी केली होती. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रियाने याबद्दलचा अनुभव सांगितला होता. “मला विषकन्या आणि काळी जादू करणारी असं म्हटलं गेलं. मात्र सुशांतवर प्रेम केल्याचा मला कधीही पश्चात्ताप झाला नाही,” असं ती म्हणाली.
2017 मध्ये अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त झाल्यानंतर पोटगीच्या अफवा पसरल्या होत्या. “तुझं आयुष्य म्हणजे फक्त तोकडे कपडे घालणे, जिम किंवा सलूनमध्ये जाणे, सुट्ट्यांचा आनंद घेणे हेच आहे का? तुझ्याकडे खरंच काही काम नाही का? की फक्त नवऱ्याच्या पैशांवर पोट भरतेय?” अशा शब्दांत एका युजरने मलायकावर टीका केली होती. त्यावर मलायकाने लिहिलं होतं, “मी सहसा अशा संभाषणात गुंतत नाही कारण ते माझ्यासाठी फारच क्षुल्लक आहे. परंतु मला इथे बोलणं भाग आहे कारण माझ्याविषयी काहीही बोलण्याआधी तुम्ही नीट माहित काढा. फक्त बसून इतरांच्या खासगी आयुष्याबद्दल टिप्पणी करण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करण्याचा विचार करा. कारण तुमच्याकडे जीवनात करण्यासारखं खूप काही चांगलं असेल.”