माजी खासदार आणि अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी बिल्किस बानो सामूहिक बलात्कार (Bilkis Bano case) प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेचा तीव्र निषेध केला. काही विद्यार्थी आणि महिलांच्या गटांसह शनिवारी त्यांनी जंतरमंतर इथं निर्णयाचा विरोध केला. “मला उल्टी येते. हे संस्कारी लोक आहेत का? आणि सत्तेत असलेला व्यक्ती अशी टिप्पणी करत आहे”, असं त्या म्हणाल्या. शबाना आझमी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचसोबत नेटकऱ्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली.
‘बिल्किस बानोसाठी न्यायाची मागणी करा. तिची आई आणि बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या डोळ्यासमोर 3 वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्या 11 दोषींना पुन्हा तुरुंगात टाका. त्यांची खूप लवकर सुटका झाली. आता त्यांना हार आणि मिठाई देऊन हिरो म्हटलं जातंय. आपल्यात माणुसकी उरली नाही का? न्यायाची ही किती फसवणूक आहे,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली.
“दोषी हे चांगले संस्कार असलेल्या ब्राह्मण कुटुंबातील आहेत,” असं भाजप आमदार सीके राऊलजी (माफीची शिफारस करणाऱ्या समितीचे सदस्य) म्हणाले होते.
ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन्स असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन म्हणाल्या, “आरोपींना माफी नव्हे तर बक्षीस देण्यात आलंय. त्यांना पुष्पहार घालण्यात आला आणि मिठाई वाटण्यात आली.” “हे कसं शक्य आहे? गुजरात सरकारने हा आदेश कसा दिला? आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे. महिला आणि भारतीय नागरिक म्हणून आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की हे सहन केलं जाऊ शकत नाही,” असं शबाना म्हणाल्या.
भारताच्या सरन्यायाधीशांना लिहिलेल्या एका खुल्या पत्रात 134 सेवानिवृत्त नोकरशहांनी सर्वोच्च न्यायालयाला हा “भयंकर चुकीचा निर्णय दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. ‘हा खटला दुर्मिळ होता कारण केवळ बलात्कारी आणि मारेकऱ्यांना शिक्षाच झाली नाही, तर आरोपींना संरक्षण देण्यासाठी आणि गुन्हा झाकण्यासाठी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणारे पोलिस आणि डॉक्टरच होते,’ असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं.