लेकाने संगीत दिलेलं गाणं ऐकून नाराज एसडी बर्मन मान खाली घालून स्टुडिओ बाहेर पडले, वाचा ‘दम मारो दम’चा किस्सा
पंचम दा हे असे संगीतकार होते, ज्यांनी संगीताच्या बाबतीत हिंदी चित्रपट उद्योगाची रूपरेषा बदलली. पंचम दांचा जन्म अशा कुटुंबात झाला, जिथे संगीत दिग्गजांचे वर्चस्व होते. त्यांचे वडील सचिन देव बर्मन (SD Burman) हे त्यांच्या काळातील एक महान संगीतकार होते.
मुंबई : संगीत ही एक अशी कला आहे, जी तुमचे दुःखी मनसुद्धा आनंदाने भरते. राहुल देव बर्मन उर्फ आरडी बर्मन (RD Burman) यांनी असे संगीत देण्यात प्रभुत्व मिळवले होते. आर डी बर्मन यांना प्रेमाने सगळे ‘पंचम’ किंवा ‘पंचम दा’ (Pancham Da) म्हणत असत. पंचम दा हे असे संगीतकार होते, ज्यांनी संगीताच्या बाबतीत हिंदी चित्रपट उद्योगाची रूपरेषा बदलली. पंचम दांचा जन्म अशा कुटुंबात झाला, जिथे संगीत दिग्गजांचे वर्चस्व होते. त्यांचे वडील सचिन देव बर्मन (SD Burman) हे त्यांच्या काळातील एक महान संगीतकार होते. संगीताच्या बाबतीत, पंचम दांच्या आई मीरा देव बर्मन (Meera Dev Burman) देखील कोणापेक्षा कमी नव्हत्या. पंचम दांच्या आई मीरा यांना संगीताचे प्रचंड ज्ञान होते.
संपूर्ण कुटुंबच संगीतमय होते, त्यामुळे पंचम दा सूर समजण्यात यशस्वी ठरले होते. त्यांनाही लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण होऊ लागली होती. पंचम दा यांनी एक गाणे तयार केले, जे त्यांचे वडील एस.डी. बर्मन यांनी 1956च्या ‘फुंटूश’ या चित्रपटात वापरले होते. हे गाणे होते, ‘ए मेरी टोपी पलट’. यानंतर, पंचम दांच्या संगीताला कधीच ब्रेक लागला नाही. त्यांनी एकापेक्षा एक हिट गाणी भारतीय चित्रपटांना दिली, जी अजूनही प्रत्येकाला ऐकायला आवडतात.
पंचम दांवर रागावले एसडी बर्मन
पंचम दांच्या यशाशी संबंधित अनेक कथा आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, या स्टार संगीतकाराला त्यांच्या एका गाण्यासाठी वडील एसडी बर्मन यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. लेखक खगेश बर्मन, ज्यांना पंचम दाचे नातेवाईक म्हटले जाते, त्यांनी एसडी बर्मनवर लिहिलेल्या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. या पुस्तकाचे नाव आहे ‘एस डी बर्मन: द वर्ल्ड ऑफ हिज म्युझिक’.
एस डी बर्मनवर लिहिलेल्या या पुस्तकात पंचम दा आणि त्यांचे वडील एस डी बर्मन यांच्यातील संबंधांवर अतिशय मोकळेपणाने बोलले गेले आहेत. दोघांशी संबंधित काही घटनांचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. दोघेही आपापल्या संगीत कलांमध्ये उत्तम होते, पण अशाही काही वेळा आल्या, जेव्हा ते त्यांच्या संगीताबद्दल एकमेकांशी सहमत नव्हते. 1971च्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटादरम्यान असेच काहीसे घडले.
मान खाली घालून एसडी बर्मन यांनी स्टुडिओ सोडला!
पंचम दा या चित्रपटाचे ‘दम मारो दम’ हे गाणे बनवत होते, त्यावेळची ही गोष्ट आहे. हे गाणे त्याच्या काळातील अतिशय हिट गाणे होते. असे म्हटले जाते की देव आनंद यांचे एसडी बर्मन यांच्याशी खूप चांगले संबंध होते, पण त्यांना त्यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून निवडण्याऐवजी त्यांनी ही जबाबदारी त्यांचा मुलगा आर डी बर्मन यांच्याकडे सोपवली. देव आनंद यांना असे वाटले की, आर डी बर्मन आपल्या चित्रपटाच्या संगीताला एक नवीन आयाम देऊ शकतील.
खगेश पुस्तकात लिहितात, जेव्हा त्यांनी (एस डी बर्मन) स्टुडिओमध्ये ‘दम मारो दम’ गाण्याचे रेकॉर्डिंग ऐकले तेव्हा ते खूप निराश झाले आणि खूप रागावले. ते अस्वस्थ देखील झाले. त्यांना असे वाटले की, आपले नाव उंचावणारा आपला मुलगा, ज्याला त्याने लहानपणापासून संगीत शिकवले होते, त्याने आपली शिकवण विसरली आहे. वारशाने मिळालेल्या संस्कृतीचे त्यांनी खंडन केले आहे, हा त्यांच्या वडिलांना निराश करण्याचा प्रयत्न होता का? राहुलने आपल्या वडीलांना हळू हळू मान खाली घालून स्टुडिओतून बाहेर पडताना पाहिले. यावेळी एखादा पराभूत राजा युद्धातून माघार घेतो, असे वाटत होते.
कसे बनले ‘दम मारो दम’ गाणे?
आरडी बर्मन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत या गाण्याच्या निर्मितीची कहाणी शेअर केली होती. त्यांनी सांगितले की, ते आणि आनंद बक्षी, देव आनंद यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटावर काम करत होते. त्याच वेळी देव आनंद तिथे आले आणि त्यांनी त्यांना सांगितले की, ‘राम का नाम बदनाम ना करो’ गाण्यापूर्वी एक परिचय संगीत असावे, ज्यात दाखवले जाईल की लोक ड्रग्स घेत आहेत. आनंद बक्षी देखील या मुलाखतीत होते. ते म्हणाले की, आम्ही लहानपणापासून ‘दम मारो दम मिट जाये गम’ हे शब्द ऐकत होतो, म्हणून आम्ही ते आमच्या गाण्यात वापरले.
यानंतर पंचम दा म्हणाले की, दुसऱ्या दिवशी देव साहेब स्टुडिओमध्ये गाणे ऐकायला आले. ‘राम का नाम बदनाम ना करो’ या गाण्याचे वर्णन करण्यापूर्वी आम्ही त्यांना सांगितले की, हे एक गाणे आहे, आधी ते ऐका, कदाचित ते या चित्रपटात चपखल बसेल. हे गाणे ऐकल्यानंतर देव साहेब आपल्याच शैलीत म्हणाले, हे गाणे ठीक आहे, पण यामुळे तुमचे ‘राम का नाम बदनाम नहीं करो’ हे गाणे खराब होईल. प्रत्येकाने त्यांना खूप विनंती केली की, कमीतकमी डिस्कसाठी हे गाणे रेकॉर्ड करा. हवं तर चित्रपटात ठेवू नका, पण डिस्कमध्ये ठेवा. मात्र, रेकॉर्डिंगनंतर हे गाणे त्यांना जास्त आवडले आणि नंतर ते चित्रपटात वापरले गेले. पण चित्रपटात फक्त एक मुखडा आणि एक अंतरा ठेवण्यात आला, संपूर्ण गाणे वापरण्यात आले नाही.
हेही वाचा :
बॉलिवूडचे ‘तीन खान’ कोणत्याही मुद्द्यावर मौन का बाळगतात? नसीरुद्दीन शाह यांनी दिलं उत्तर