इंद्रकुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ (Thank God) हा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. दिग्दर्शक आणि या चित्रपटातील अभिनेते अजय देवगण (Ajay Devgn), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. जौनपूर कोर्टात वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी हा खटला दाखल केला आहे. याचिकाकर्त्याचा जबाब येत्या 18 नोव्हेंबर रोजी नोंदवण्यात येणार आहे. थँक गॉड या चित्रपटाच्या ट्रेलरवर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
थँक गॉड या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. ‘ट्रेलरमध्ये सूट परिधान केलेला अजय देवगण हा चित्रगुप्तची भूमिका साकारताना दिसतोय. एका सीनमध्ये तो थट्टा मस्करी करताना तर दुसऱ्या सीनमध्ये तो आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसतोय’, असं श्रीवास्तव यांनी याचिकेत म्हटलंय.
“चित्रगुप्त यांना कर्माचे देवता मानलं जातं. ते मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा ठेवतात. अशा देवतेला चित्रपटात आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत”, असंही त्यांनी याचिकेत स्पष्ट केलं आहे.
थँक गॉड हा कॉमेडी चित्रपट असून येत्या 25 ऑक्टोबर रोजी तो थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांच्या भूमिका आहेत. अजय आणि रकुल या चित्रपटाच्या निमित्ताने तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी त्यांनी दे दे प्यार दे आणि रनवे 34 यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
दिवाळीला थँक गॉड या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाशी होणार आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. राम सेतूमध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरुचा यांच्या भूमिका आहेत.