‘मुक्ती बंधन’ या मालिकेत आय. एम. विरानी हे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथालेखक शिव सुब्रह्मण्यम (Shiv Subrahmanyam) यांचं निधन झालं. चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी ट्विटरवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी पश्चिम इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. शिव सुब्रह्मण्यम यांनी आलिया भट्ट आणि अर्जुन कपूरच्या ‘टू स्टेट्स’ (Two States) आणि सान्या मल्होत्राच्या ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘टू स्टेट्स’मध्ये ते आलियाच्या वडिलांच्या भूमिकेत होते. ‘अत्यंत दु:खद अंतकरणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की अत्यंत प्रतिभावान कलाकार शिव सुब्रह्मण्यम यांचं निधन झालं’, अशी पोस्ट हंसल मेहता यांनी लिहिली.
‘शिव सुब्रह्मण्यम हे अत्यंत प्रतिभावान कलाकार होते. इतकंच नव्हे तर व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी सर्वांची मनं जिंकली होती. त्यांची पत्नी दिव्या, त्यांच्या आई, रोहन, रिंकी, भानू चिट्टी आणि शिवच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराला या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो, अशी प्रार्थना मी करतो. 11 एप्रिल रोजी सकाळी अंधेरी पश्चिममधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. हंसल मेहता यांच्या ट्विटवर कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘धक्कायदायक बातमी, प्रतिभावान कलाकार आणि अत्यंत चांगल्या मनाचा माणूस. त्यांनी हे जग फार लवकर सोडलं’, असं अभिनेता रणवीर शौरेनं लिहिलं.
— Hansal Mehta (@mehtahansal) April 11, 2022
1989 मध्ये विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिंदा’ या चित्रपटाचं आणि 2005 मधील सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’चंही पटकथालेखन त्यांनी केलं होतं. या दोन्ही चित्रपटांमध्ये ते पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ आणि ‘नेल पॉलिश’ या चित्रपटांमध्ये ते अखेरचे झळकले. त्यांनी ‘हिचकी’, ‘रॉकी हँडसम’, ‘बंगिस्तान’, ‘रहस्य’, ‘टू स्टेट्स’, ‘दॅट गर्ल इन यलो बूट्स’, ‘स्टॅन्ली का डब्बा’, ‘तीन पत्ती’, ‘कमीने’, ‘1942: अ लव्ह स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. त्याचप्रमाणे ‘लाखों मे एक’, ‘प्रधानमंत्री’, ‘किस्मत’ यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं.
हेही वाचा: