मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका यांच्या ‘पठाण’ चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने दहाहून अधिक कट्स सुचवले आहेत. यात ‘बेशर्म रंग’ या गाण्यातील काही दृश्यांचाही समावेश आहे. चित्रपटातील काही डायलॉग्स आणि दीपिकाच्या काही सीन्सवर सेन्सॉरची कात्री लागली आहे. पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही शब्द बदलण्यास सांगितलं आहे. हे शब्द कोणते आहेत, ते जाणून घेऊयात..
RAW (रॉ)- हमारे
लंगडे लुले- टुटे फुटे
PM (पीएम)- प्रेसिडेंट किंवा मिनिस्टर
अशोकचक्र- वीर पुरस्कार
एक्स केजीबी- एक्स एसबीयू
मिसेस भारतमाता- हमारी भारतमाता
स्कॉच- ड्रिंक
ब्लॅक प्रिझन, रशिया- ब्लॅक प्रिझन
चित्रपटातील PMO हा शब्द 13 जागांवरून काढून टाकण्यात आला आहे, असं कळतंय.
‘बेशर्म रंग’ या गाण्यातील दीपिकाचे अंगप्रदर्शन करणारे काही सीन्स बदलण्यास सांगण्यात आले आहेत. साईड पोझचे शॉट्स (पार्शिअल न्युडिटी), ‘बहुत तंग किया’ हे बोल सुरु असताना दीपिकाचा डान्स बदलण्यात येणार आहे. मात्र ज्या भगव्या बिकिनीवरून एवढा मोठा वाद झाला, त्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री चालली की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
12 डिसेंबर रोजी या चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशर्म रंग’ प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातील एका दृश्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली. यावरूनच मोठा वाद सुरू झाला. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करून, बोल्ड दृश्ये देत सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला.