मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे राज्यात कुठल्याही प्रकारच्या चित्रिकरणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याबाबत 20 मे रोजी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं. या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे, असं मत राज यांनी मांडलं. त्यानंतर मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिल्यास त्यांना मंजुरी देता येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. (CM Uddhav Thackeray approves shooting in Maharashtra)
उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती राज ठाकरे यांनी दिलीय. बायो बबल नेमका कसा असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची संख्या किती असेल, सरकारने आखून दिलेल्या नियमांची कशी अंमलबजावणी होणार, चित्रीकरणाची जागा कोणती असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची राहण्याची व्यवस्था काय असेल अशा सर्व बाबी नमूद असलेला प्रस्ताव जर प्रत्येक निर्मात्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे सादर केला तर त्यापुढील मंजुरीसाठी कार्यवाही करण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी सांगितलंय. आज झालेल्या ‘झूम’ संवादात निर्माते आणि टीव्ही चॅनल प्रमुख यांच्याशी राज ठाकरे यांनी आज चर्चा केली. गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी त्वरित तोडगा काढल्याबद्दल ‘झूम’ चर्चेत उपस्थित सर्वांनीच त्यांचे आणि मनसे प्रयत्नांचे मनापासून आभार मानले.
सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या आसपासच्या परिसरातच चित्रीकरणासाठी परवानगी मिळू शकेल, राज्यातील इतर भागात कोरोना संक्रमणाचं प्रमाण गंभीर आहे, त्यामुळे तिथे लगेचच चित्रीकरणासाठी परवानगी मिळणं कठीण आहे, असंही राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. मनोरंजन क्षेत्राला सध्या भेडसावणाऱ्या इतर गंभीर समस्यांबद्दलही सरकारी यंत्रणेसोबत पाठपुरावा सुरु राहील, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी दिलं आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा राज ठाकरे यांनी 20 मे रोजी घेतला होता. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला. त्यांच्या समस्याही राज ठाकरेंनी जाणून घेतल्या. महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
नाट्य, चित्रपट, संगीत, मालिका ह्या क्षेत्रात कार्यरत ५० हुन अधिक मान्यवरांशी राजसाहेबांनी संवाद साधला. चित्रीकरणाची सद्यस्थिती, लोक कलावंत-वाद्यवृंद ह्यांना मदत ह्या आणि अशा कलाक्षेत्राच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, अशी राजसाहेबांची कलाकारांना ग्वाही. pic.twitter.com/235vhlgHez
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 20, 2021
संबंधित बातम्या :
CM Uddhav Thackeray approves shooting in Maharashtra