आपल्या विनोदकौशल्याने सर्वांना खळखळून हसवणाऱ्या कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा बरी आहे. राजू श्रीवास्तव यांचा रक्तदाब (Blood Pressure) आता नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू यांची प्रकृती अकराव्या दिवशी नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑक्सिजन आता 20% वरून 50% पर्यंत वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती, मात्र आता ते ठीक असल्याचं कळतंय. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते जॉनी लिव्हर आणि नरेंद्र बेदी हे शनिवारी राजू यांना पाहण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली आणि राजू लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली.
राजू श्रीवास्तव यांचं संपूर्ण कुटुंब एम्समध्ये असून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. राजू यांचे पीआरओ गरवीत नारंग यांनी सांगितलं की, राजू श्रीवास्तव यांच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी शिखा, मुलगी अंतरा, मुलगा आयुष्मान, धाकटा भाऊ दीपू श्रीवास्तव, काजू श्रीवास्तव, मोठा भाऊ सीपी श्रीवास्तव, पीपी श्रीवास्तव, रमण श्रीवास्तव यांनी कानपूरमध्ये 51 कडुनिंबाची रोपटं लावली आहेत. कानपूर इथल्या त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानाजवळ ही रोपटं लावण्यात आली आहेत.
संसर्गाच्या भीतीमुळे राजू श्रीवास्तव यांना भेटू दिलं जात नाहीये. आधी केवळ पत्नी शिखा यांनाच आयसीयूमध्ये जाण्याची परवानगी होती. मात्र आता त्यांनासुद्धा मनाई करण्यात येत आहे. राजू यांना आता कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून दूर राहावं लागेल, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या उपचारासाठी उपस्थित असलेले नर्सिंग कर्मचारी ड्युटीच्या वेळी आयसीयूमधून बाहेरही येत नाहीत.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे मोठे भाऊ सीपी श्रीवास्तव म्हणाले, “दिल्लीच्या एम्समधील न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. एमव्ही पद्मा यांना काही कामानिमित्त कोलकात्याला जायचं होतं. दरम्यान, राजू यांची प्रकृती खालावल्यानंतर प्रा. पद्मा यांना कोलकाताहून परत बोलावण्यात आलं. शुक्रवारी कोलकाताहून परतलेल्या डॉक्टरांनी कुटुंबीयांना धीर दिला. सध्या राजू यांच्या मेंदूवर उपचार प्रा. पद्मा करत आहेत.”