मुंबई: गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘पठाण’मधील ‘बेशर्म रंग’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. हे गाणं प्रदर्शित होताच पठाण वादाच्या भोवऱ्यात सापडला. यातील काही दृश्यांमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसली. यावरूनच हा वाद निर्माण झाला. दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला. या संपूर्ण वादावर आता पहिल्यांदाच दीपिकाची प्रतिक्रिया समोर आली आहे. यशराज फिल्म्सच्या युट्यूबवर दीपिकाच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पठाणमधील कोणतं गाणं तुला सर्वाधिक आवडतं असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारला गेला. त्यावर दीपिका म्हणाली, “पठाणमधील दोन्ही गाणी मला आवडतात. त्यातील एखादं निवडणं खूप कठीण आहे. कारण दोन्ही गाणी एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. बेशर्म रंग या गाण्यासाठी मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागली होती. कारण ते माझं सोलो गाणं होतं. ज्या ठिकाणी गाण्याची शूटिंग झाली, ते लोकेशनसुद्धा शूटिंगसाठी अवघड होतं. तिथे खूप थंडी आणि वारा होता. अशा हवामानात शूटिंग करणं कठीण असतं.”
“दोन्ही गाण्यांची शूटिंग करताना मला मजा आली. शाहरुख आणि मी जेव्हा एकत्र डान्स करतो तेव्हा खूप मजा आली. दोघांनाही डान्स चांगल्या पद्धतीने येत असल्याने स्टेप्स लक्षात ठेवणं अवघड नसतं. ही दोन्ही गाणी माझी आवडती आहेत. पण सर्वांत सुंदर बाब म्हणजे ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली”, असं ती पुढे म्हणाली.
बेशर्म रंग या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंटने केली. तर शिल्पा रावच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. बिकिनीच्या वादावर वैभवीनेही प्रतिक्रिया दिली होती. “बीचवर कोणीच अंगभर कपडे घालून जात नाही”, असं ती म्हणाली होती.
या गाण्यातील केमिस्ट्रीबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, “बेशर्म रंग गाण्यातील चांगल्या केमिस्ट्रीचं श्रेय मला आणि शाहरुखला जातं. त्यावेळी शाहरुख डाएटवर होता आणि त्याला बराच वर्कआऊटसुद्धा करावा लागला. त्याची मेहनत गाण्यात दिसून येते.”
पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबतच जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.