कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील इंडियोमध्ये पार पडलेल्या ‘कोचेला वॅली म्युझिक अँड आर्ट्स फेस्टिव्हल’मध्ये परफॉर्म करणारा दिलजित दोसांज हा पहिला पंजाबी गायक ठरला आहे. या प्रतिष्ठित म्युझिक फेस्टिव्हलमध्ये दिलजितने दोन वेळा परफॉर्म केलं. मात्र त्याचा दुसरा परफॉर्मन्स सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी मंचावर असलेल्या दिलजितने केलेल्या एका वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्याने भारतीय झेंड्याचा अपमान केल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. त्यावर आता दिलजितने ट्रोलर्सना फटकारलंय.
कोचेलामध्ये परफॉर्म करताना दिलजित एका मुलीकडे इशारा करत म्हणाला, “ही मुलगी माझ्या देशाचा झेंडा घेऊन उभी आहे. हे माझ्या देशासाठी आणि सर्वांसाठी आहे. संगीत सर्वांसाठी आहे, त्याचा वापर द्वेष पसरवण्यासाठी करू नका.” यावरून काहींनी दिलजितवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केला. या ट्रोलिंगवर आता दिलजितने सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘खोटी बातमी आणि नकारात्मकता पसरवू नका. मी असं म्हटलंय की हा माझ्या देशाचा झेंडा आहे, जो त्या मुलीने इथे आणलाय. याचा अर्थ तिला माझ्या देशातील माझा परफॉर्मन्स समजला. तुम्हाला पंजाबी कळत नसेल तर कृपया गुगल करा. कारण कोचेला हा खूप मोठा म्युझिक फेस्टिव्हल आहे. देशभरातील लोक तिथे हजेरी लावतात. त्यामुळे संगीत हे सर्वांसाठी आहे. योग्य शब्दांना कसं मोडून-तोडून सादर करावं, हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे’, असं त्याने लिहिलंय.
या ट्विटनंतर चाहत्यांनीही दिलजितची बाजू घेतली. ‘चक दे फट्टे’ असं एकाने लिहिलं. तर ‘लव्ह यू वीरे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. राजकारणी मंजिंदर सिंग सिरसा यांनीसुद्धा ट्रोलर्सना फटकारलं. ‘दिलजितचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट केला असता तर बरं झालं असतं. त्याने हा कॉन्सर्ट संपूर्ण देश आणि पंजाबला समर्पित केला आहे. काही सोशल मीडिया हँडल्स अशा पद्धतीने नकारात्मका आणि द्वेष पसवताना पाहून लाज वाटते’, असं त्यांनी लिहिलंय.
DON’T SPREAD FAKE NEWS & NEGATIVITY ❌
Mai Kiha Eh Mere Desh Da Jhanda Hai ?? Eh Mere Desh Lai.. Means MERI Eh Performance Mere desh Lai
Je Punjabi Nhi Aundi Tan Google Kar leya Karo Yaar…Kion ke Coachella Ek Big Musical Festival Aa Othey Har desh to log aunde ne.. that’s…
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) April 25, 2023
दिलजितने ‘प्रॉपर पटोला’, ‘डु यू नो’ आणि ‘पटियाला पेग’ यांसारख्या गाण्यांनी जगभरातील चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. त्याने बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलंय. यासोबतच ‘फिलौरी’, ‘सूरमा’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘अर्जुन पटियाला’, ‘सूरज पे मंगल भारी’ आणि ‘गुड न्यूज’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.