रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणारे कलाकार दीपिका चिखलिया आणि अरुण गोविल पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. मात्र यावेळी ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
तब्बल 35 वर्षांनंतर दीपिका आणि अरुण स्क्रीनवर पुनरागमन करत आहेत. 'नोटीस' या चित्रपटात दोघं भूमिका साकारणार आहेत. 35 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी दीपिका यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.
"कोविडनंतर आम्ही अनेकदा एकत्र आलो होतो. मात्र चित्रपटात आम्ही बऱ्याच कालावधीनंतर एकत्र काम करणार आहोत. बरेच बदल झाले आहेत. त्यावेळी आम्ही खूप तरुण होतो. आता आम्ही दोघांचंही वय वाढलं आहे", असं त्या म्हणाल्या.
चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, "त्यांची भूमिका एका असंयमी व्यक्तीची आहे, ते खूप रागीट असतात. आम्हा दोघांना आता या भूमिकांसाठी सतत हसण्याची गरज नाही. मी तुम्हाला ऑनस्क्रीन त्यांच्यावर ओरडतानाही दिसणार आहे. माझ्यासाठी हा एकंदरीत अनुभव खूप चांगला होता."
इतक्या वर्षांत अशी एक गोष्ट आहे, जी अजूनही बदलली नाही, अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. "लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कधीच बदलला नाही. लोक आजही आमच्याकडे सामान्य माणसांप्रमाणे बघत नाहीत. आता आम्हाला या गोष्टीची सवय झाली आहे", असं त्या म्हणाल्या.