मुंबई | 18 जानेवारी 2024 : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचं वैयक्तित आयुष्य सध्या वादळी झालं आहे. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. सानियाने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शोएबचे सर्व फोटो हटवले. त्यानंतर तिने एक क्रिप्टीक पोस्टही शेअर केली. त्यामुळे ती आणि शोएब वेगळं होत असल्याच्या बातम्यांनी अजूनच जोर धरला. त्यातच आता सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न आणि घटस्फोटाबद्दल, एकंदर आयु्ष्यबद्दल पोस्ट शेअर केली आहे.’ लग्न कठीण असतं, घटस्फोट कठीण असतो’ अशा आशयाची एक पोस्ट तिने शेअर केली असून त्यावरूनही लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सानिया आणि शोएब यांच्या नात्यात आलबेल काहीच नसल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. ते एकमेकांसोबत फारच कमी वेळा दिसले. सोशल मीडियावर ते एकमेकांना फॉलो करत असले तरी ते एकमेकांसोबतचे फोटो शे्र करत नाहीत. सानिया फक्त तिचे आणि तिच्या मुलासोबतचे फोटो शेअर करते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील शोएबसोबतचे सर्व फोटोही काढून टाकल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अजूनच वेगाने सुरू झाल्या.
सानियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली स्टोरी
त्यातच आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न, घटस्फोट याच्याशी निगडीत पोस्ट शेअर केली. ‘ लग्न कठीण असतं, घटस्फोट कठीण असतो.. जाडेपणा कठीण असतो, फिट राहण कठीण असतं.. कर्ज घेण कठीण असतं, हात राखून पैसे खर्च करण कठीण असतं. संवाद राखणं कठीण असतं, न बोलणं कठीण असतं. आयुष्य कधीच सोप नसतं, ते नेहमीच कठीण असतं. पण आपण आपल्या कठीण गोष्टी स्वत: निवडतो. त्याची समजूतदारपणे निवड केली पाहिजे, ‘ अशी पोस्ट सानियाने लिहीली आहे.
सानियाची स्टोरी झाली व्हायरल
या पोस्टमध्ये तिने लिहीलं आहे लग्न कठीण असतं, घटस्फोटही सोपा नसतो, तो कठीण असतो. तिच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे, असं सानिया सतत नमूद करत आली आहे. याच कारणामुळे तिच्या चाहत्यांना असं वाटतंय की तिने स्पष्टपणे काही न बोलता, इशाऱ्यांमध्ये घटस्फोटाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे. ती आणि शोएब वेगळे झाले आहेत, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर तिच्या या स्टोरीचे स्क्रीनशॉट्स शेअर केले जात आहेत. शोएब मलिक आणि सानियाने 2010 साली लग्न केलं होतं, त्यावेळी या लग्नामुळे बरेच वाद झाले होते.
सानिया-शोएबचं लग्न चर्चेत
सानिया आणि शोएब या दोघांचं लग्न नेहमीच चर्चेत होतं. गेल्या वर्षी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या तेव्हा शोएब आणि पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरचं अफेअर असल्याच्या बातम्याही समोर आल्या. पण आत्तापर्यंत सानिया किंवा शोएब यांच्यापैकी कोणीच या मुद्यावर काहीही भाष्य केलेलं नाही. सानिया आणि शोएबला एक मुलगा आहे. आणि टेनिस स्टार सानिया, अनेकदा तिच्या लाडक्या मुलासह स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. तो तिची सर्वात मोठी ताकद आहे, हेच ती त्यातून दर्शवण्याचा प्रयत्न करते.