मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. नीना गुप्ता यांनी त्यांच्या बोल्डनेसनं अनेक तरूण प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. तसंच नीना गुप्ता या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसंच त्या अभिनयासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आताही नीना यांनी त्यांच्या पहिल्या किसीं सीनचा किस्सा शेअर केला आहे, ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या किसींग सीनचा किस्सा सांगितला आहे. नीना यांना तो सीन करताना खूपच दडपण आलं होतं. तसंच तो सीन करणं त्यांना अवघड झालं होतं. तो सीन झाल्यानंतर त्यांची अशी अवस्था झाली होती की त्या रात्रभर झोपल्या नव्हत्या.
नीना गुप्ता यांनी मुलाखतीत सांगितलं की, काही वर्षांपूर्वी मी दिलीप धवन यांच्यासोबत एक मालिका केली होती. या मालिकेतून भारतातील टेलिव्हिजनवरचा पहिला किसींग सीन दाखवण्यात येणार होता. त्यावेळी तो सीन करायचं समजल्यानंतर मी रात्रभर झोपले नव्हते. कारण मी आणि दिलीप धवन एकमेकांचे चांगले मित्रही नव्हतो. फक्त आम्ही सोबत काम करायचो. ते दिसायलाही चांगले होते पण या गोष्टीचा मला फरक पडत नव्हता पण हा सीन करण्यासाठी मी शारिरीक आणि मानसिकरीत्या तयार नव्हते.
पुढे त्यांनी सांगितलं की, हा सीन करण्याअगोदर मी खूप टेन्शनमध्ये होते. पण तो सीन करणंही तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे मी स्वतःला खूप समजावलं आणि तो सीन केला. तो सीन पूर्ण झाल्यानंतर मी डेटॉलने गुळण्या केल्या होत्या. कारण ज्याला मी नीट ओळखतही नाही त्याच्यासोबत तो सीन करणं म्हणजे खूपच कठीण होतं.
हा सीन पूर्ण झाल्यानंतर चॅनेलला वाटलं की आपल्या हाती खजिना लागला आहे. त्यामुळे त्या लोकांनी किसींग सीनने एपिसोड प्रमोट केला होता. पण नंतर काही उलटंच झालं. त्यावेळी जास्त चॅनेल नसायचे. एकच टिव्ही असायचा त्यामुळे संपूर्ण परिवार एकत्र बसून मालिका पाहायचे. त्यामुळे बहुतेक लोकांनी या सीनवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तो सीन हटवण्यात आल्याचं नीना गुप्ता यांनी सांगितलं.