Shah Rukh Khan ची कमाई फक्त पिक्चरमधूनच नाही, या 5 सोर्समधूनही कमावतो बक्कळ पैसा, त्याचं नेटवर्थ माहीत आहे का ?
Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा सर्वात तरुण अभिनेता शाहरुख खान आज 58 वर्षांचा झाला आहे. तो जगातील सर्वात महागडा स्टार आहे आणि कमाईच्या बाबतीत तो बॉलिवूडचा नवा 'पठाण' आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्याचे कमाईचे सोर्सेस काय आणि त्याची एकूण संपत्ती किती हे तुम्हाला माहिती आहे का ?
मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान (shah rukh khan) आज 58 वर्षांचा झाला आहे. त्याचे या वर्षी रिलीज झालेले ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी ताबडतोड कमाई करत अनेक विक्रम रचले आहेत. शाहरूख हा जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटसृष्टीमधील त्याच्या कारकिर्दीला जवळपास 35 वर्षं झाली असून ‘झिरो’ ते बॉलिवूडचा सर्वात यशस्वी ‘हिरो’ बनण्याचा प्रवास त्याने अथक मेहनतीने पूर्ण केला आहे. पण शाहरुख फक्त बॉलीवूडच्या चित्रपटांमधूनच कमाई करत नाही, तर त्याची कमाई अनेक वेगवेगळ्या सोर्सेसद्वारे होते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
शाहरुख हा फक्त एक अभिनेताच नव्हे तर यशस्वी आणि उत्तम बिझनेसमनही आहे. अनेक स्टार्टअप्समध्येही त्याने गुंतवणूक केली आहे. आयपीएलच्या ‘कलकत्ता नाइट रायडर्स’ टीमचा तो को-ओनरही आहे. आणि ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ नावाचे त्याचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही आहे. याशिवाय तो अनेक सोर्सद्वारा बक्कळ कमाई करतो. त्याचं नेटवर्थ किती, तेही जाणून घेऊया.
शाहरुख खानचे नेटवर्थ
मुंबईतील बँडस्टँड भागात सुमारे 200 कोटी रुपयांच्या ‘मन्नत’ बंगल्यात राहणाऱ्या शाहरुख खानची एकूण संपत्ती 6300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. दुबईतील ‘पाम जुमेरा’मध्ये त्याचा तब्बल 100 कोटींचा बंगला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो. तो चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 280 ते 300 कोटींच्या घरात आहे.
शाहरुख खानचे इनकम सोर्स
- चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुख खान अनेक ब्रँड्स एंडोर्स करतो. प्रत्येक जाहिरातीसाठी तो 10 कोटी रुपयांपर्यंत फी आकारतो. रिलायन्स जिओ, ह्युंदाई, थम्स अप, दुबई टुरिझम आणि आयटीसी सनफिस्ट डार्क फॅन्टसी सारख्या ब्रँड्सची शाहरुख जाहिरात करतो.
- तर त्याच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ नावाच्या प्रॉडक्शन हाऊसची वार्षिक उलाढाल सुमारे 500 कोटी रुपये आहे. त्याची पत्नी गौरी खान ही त्यामध्ये त्याची जोडीदार आहे. गौरी ही एक यशस्वी आणि प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर असून ‘डी-डेकोर’ हा तिचा स्वतःचा लक्झरी लाइफस्टाइल ब्रँडही आहे.
- आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्समध्येही शाहरुख खानने गुंतवणूक केली आहे. ब्रँड एंडोर्समेंट्स, मॅच फी, फ्रँचायझी फी, बीसीसीआय इव्हेंट रेव्हेन्यू आणि बक्षीस रकमेच्या रूपात तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
- एवढेच नव्हे तर शाहरुखने KidZania ब्रँडमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यात त्याची 26 टक्के भागीदारी आहे. तो त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडरही आहे. ही कंपनी मुलांसाठी इनडोअर अॅम्युझमेंट पार्क बनवते, जे शिक्षण आणि मनोरंजन या मिक्स थीमवर आधारित आहेत.
- शाहरुख खान अनेकदा टीव्ही शोमध्येही दिसतो. त्याने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत. टीव्हीवर शो करण्यासाठी तो प्रत्येक भागासाठी 2 ते 2.5 कोटी रुपये घेतो. शाहरुख खान लग्नातही परफॉर्म करतो, त्यासाठी तो 4 ते 8 कोटी रुपये आकारतो.