शीख समुदायाच्या भावना दुखावल्या, दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात गुन्हा
‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये अभिनेता सैफ अली खान स्वत:च्या हातातलं कडं काढून समुद्रात फेकताना दिसतो. या दृश्यावर आक्षेप घेत दिल्लीचे भाजप प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी तक्रार नोंदवली होती.
मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) अडचणीत येण्याची शक्यता आहे. ‘सेक्रेड गेम्स 2’ (Sacred Games 2) या वेब सीरीजमधील एका दृश्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्याची तक्रार केल्यानंतर अनुरागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये अभिनेता सैफ अली खान शीख पोलिसाच्या भूमिकेत आहे. एका दृश्यामध्ये तो स्वत:च्या हातातलं कडं काढून समुद्रात फेकताना दिसतो. या दृश्यावर आक्षेप घेत दिल्लीचे भाजप प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी तक्रार नोंदवली होती. तर भाजप आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनीही सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला होता.
नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) , सैफ अली खान (Saif Ali Khan), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिजचा दुसरा सिझन ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) वर धुमाकूळ घालत आहे.
हातातील कडं (Kakaars) ही शीख धर्मातील एक पवित्र आणि अविभाज्य भाग आहे. हे कडं अपार श्रद्धेने परिधान केलं जातं. ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये दिग्दर्शकाने या कड्याचा आणि पर्यायाने शीख समुदायाचा अपमान केल्याचा आरोप बग्गा यांनी तक्रारीत केला आहे.
I wonder why Bollywood continues to disrespect our religious symbols! Anurag Kashyap deliberatly puts this scene in #SacredGamesS2 where Saif Ali Khan throws his Kada in sea! A KADA is not an ordinary ornament. It’s the pride of Sikhs & a blessing of Guru Sahib @NetflixIndia @ANI pic.twitter.com/c2KMbJVrwA
— Manjinder S Sirsa (@mssirsa) August 19, 2019
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी शीख समुदायाच्या भावना भडकवण्यासाठी आणि समाजातील धार्मिक गटांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हा सीन टाकला, असाही दावा बग्गा यांनी केला आहे. या प्रकरणी अनुराग कश्यपविरोधात कलम 295 ए, 153 ए, 504, 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराग कश्यप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. 10 ऑगस्टला त्याने स्वत:चं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं होतं. आई-वडील आणि मुलीला सोशल मीडियावरुन सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं सांगत त्याने अकाऊण्ट बंद केलं होतं.
जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवण्यावरुन अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. ही पद्धत चुकीची आणि दहशत निर्माण करणारी असल्याचा आरोप त्याने केला होता.
दुसरीकडे, सेक्रेड गेम्स 2 मध्ये गँगस्टर इसाचा नंबर म्हणून दुबईस्थित भारतीय कुन्हाब्दुल्ला यांचा मोबाईल क्रमांक दाखवला गेला. त्यामुळे नेटफ्लिक्सने माफी मागत त्या दृश्यातून संबंधित नंबर हटवला आहे.