‘देशाने एक महान नेता गमावलाय..’; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त

| Updated on: Dec 27, 2024 | 11:16 AM

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीतल्या ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सिंग यांच्यावर वृद्धापकाळाशी निगडीत आजारांवर उपचार केले जात होते. गुरुवारी रात्री घरात ते बेशुद्ध झाले, त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू करण्यात आले. रात्री […]

देशाने एक महान नेता गमावलाय..; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
मनमोहन सिंग
Image Credit source: Instagram
Follow us on

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीतल्या ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सिंग यांच्यावर वृद्धापकाळाशी निगडीत आजारांवर उपचार केले जात होते. गुरुवारी रात्री घरात ते बेशुद्ध झाले, त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू करण्यात आले. रात्री 8.06 वाजता त्यांना ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री 9.51 वाजता सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला, असं ‘एम्स’ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त पसरताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आपल्या माजी पंतप्रधानांच्या निधनाने मी दु:खी आहे. एक असे राजकारणी ज्यांचं आपल्या देशाच्या विकासाच्या प्रत्येक पैलूमधील योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो’, असं अभिनेता मनोज बाजपेयीनं लिहिलंय. तर अभिनेता संजय दत्तनेही इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांचा एक फोटो शेअर करत निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. संजय दत्तने लिहिलं, ‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने मला खूप दु:ख झालं आहे. त्यांचं योगदान भारत कधीही विसरणार नाही.’

हे सुद्धा वाचा

अभिनेता सनी देओलनेही एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘डॉ. मनमोहन सिंग हे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी भारताच्या आर्थिक उदारीकरणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची बुद्धिमत्ता, निष्ठा आणि राष्ट्राच्या विकासातील योगदान सदैव स्मरणात राहील. माझ्या मन:पूर्वक सहवेदना’, असं त्याने लिहिलंय.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘द ॲक्सिटेंडल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात मनमोहन सिंग यांना साकारताना त्यांच्या अनेक गोष्टींचा कशा पद्धतीने अभ्यास केला, याविषयी त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. काही राजकीय कारणांमुळे सुरुवातीला त्यांनी हा प्रोजेक्ट नाकारल्याचाही खुलासा अनुपम खेर यांनी केला. ते म्हणाले, “एखादं पात्र साकारण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सर्वकाही जाणून घ्यावं लागतं. डॉ. मनमोहन सिंग हे सौम्य स्वभावाचे, तेजस्वी, बुद्धिमान आणि दयाळू होते. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झालंय. कारण त्यांच्यासोबत मी काही वेळ घालवला, असं मला वाटतं. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मला त्यांच्यात दयाळूपणा, उदारपणा दिसला. माझ्या चित्रपटासाठी त्यांनी प्रार्थना केली होती. त्यांचा सर्वोत्तम गुण म्हणजे त्यांची प्रामाणिकता. ते सर्वांचं ऐकून घ्यायचे. त्यांनी या देशासाठी खूप काही केलंय. दयाळूपणा हा सर्वांत कठीण गुणांपैकी एक आहे आणि तो त्यांच्याकडे होता.”