लता दीदींशी मैत्री, सिनेमाचं वेड, खेड्यातील रंगू ते सुलोचनापर्यंतचा प्रवास
भारतीय सिनेमाच्या पडद्यावरील घरंदाज मराठी सोज्वळ चेहरा म्हणून परिचित असलेल्या सुलोचना दीदी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुंबई : सुलोचना दीदी म्हणजे शालिनता, सोज्वळता, वात्सल्याचे रुप..भारतीय सिनेमाच्या पडद्यावरील सोशिक आई आज आपण गमावली अशीच सर्वांची सामुहिक भावना त्यांच्याबद्दल उमटेल. १९४३ पासून १९९५ पर्यंत प्रदीर्घ काळ मराठी – हिंदी सिने सृष्टीत आपल्या सोज्वळ अभिनयाने आणि आपल्या नावाचा दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरलेली ही खानदानी अभिनेत्री सिनेमातील अभिनयासाठी गावखेड्यातून शहरात आली. एका फौजदाराची लेक असूनही तिने सिनेमाची वाट धरली याचे आश्चर्य तुम्हाला वाटेल..पाहा रंगूचा सुलोचनापर्यंतचा प्रवास आणि लता दीदींशी त्यांची मैत्री कशी झाली..
बेळगांव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट नावाच्या खेड्यात फौजदार शंकरराव दिवाण आणि तानी बाई यांच्या पोटी मोठ्या नवासाने ३० जुलै १९२९ रोजी सुलोचना दीदी यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी झाला म्हणून कोणी तिला नागू देखील म्हणत. पण तिचं नाव ठेवलं होतं ‘रंगू’. उघड्या रानमाळावर मनसोक्त हुंदडणारी, सायकल चालवणारी रंगू शिक्षणात फार रमली नाही. लहानपणी रंगू चुलतभावांबरोबर गावभर फिरत असे. बारा वर्षांची होईपर्यंत शर्ट पॅण्ट घालून सायकलवर रंगू हुंदडायची हे कुणाला सांगूनही पटणार नाही, बालपणापासूनच तिला सिनेमाचे वेड होते. फौजदाराची लाडाची लेक ! तिला तिकीट कोण विचारणार ?
ही मोठी कलाकार होईल
गैबीसाहेबाच्या दर्ग्याच्या उरूसात रंगूला सिनेमाला पाहायला मिळायचा. पडद्याच्या जास्तीत जास्त जवळ बसून सिनेमा पहाण्याची तिला आवड होती. रंगूला पडद्यामागे काय आणि कोण असतं याची मोठी उत्सुकता असे. तिची मावशी बनूअक्का यांना वाटे आपली पोरगी सिनेमात जाणार. त्यांनीच रंगूच्या सिनेमा वेडाला खतपाणी घातलं असावं. चिक्कोडी तालुक्याच्या गावचे प्रसिध्द वकील पुरुषोत्तम बेनाडीकर हे वडीलांचे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणं येणं असे. मावशीनी एकदा बेनाडीकर वहिनींकडे तक्रार केली, “नुसती भटकते, कामधाम करत नाही. शंकररावांनी लाडावून ठेवलंय अगदी. त्यावर बेनाडीकर म्हणाले, आपण हिला सिनेमात पाठवू, ही मोठी कलाकार होईल.
३० रुपये पगारावर काम सुरु
मास्टर विनायक हे बेनाडीकरांचे विद्यार्थी. मा.विनायक एकदा गुरुंना भेटायला चिक्कोडीला आले असतांनाच वकील साहेबांनी त्यांच्याकडं म्हणणं मांडलं. मग काय त्यांनी रंगूला थेट प्रफुल्ल चित्रमध्ये पाठवायला सांगितले. येथूनच रंगूचा सिनेमाचा प्रवास सुरु झाला. गुरुंना कबुल केल्याप्रमाणे विनायकरावांनी रंगूला महिना ३० रुपये पगारावर आपल्याकडे कामावर घेतलं. रोज सकाळी ११ ते ६ स्टुडिओत हजेरी लावायला ती जायची. लवकरच नव्या सिनेमाचं काम सुरू झालं.
लता दीदींशी मैत्री झाली ती कायमचीच
१९४३ साली “चिमुकला संसार” या सिनेमातून रंगूची अर्थात सुलोचना दीदींची अभिनय कारकीर्द सुरू झाली. रंगू आणि राजा गोसावी यांच्यावर पहीलाच एक सीन चित्रीत करण्यात आला. रंगूचा सिनेमा प्रवास सुरु झाला. खरा परंतू.. तिच्या गावंढळ बोलचालीने तिला प्रफुल्ल मधील मंडळी चिडवू लागली. अशावेळी तिच्याच वयाची एक चुणचुणीत मुलगी तिच्या मदतीला धावून आली त्या म्हणजे म्हणजे भारतरत्न लता दीदी त्या दोघींची मैत्री अगदी काल परवा पर्यंत टिकून होती, परंतू लता दीदी गेल्या आता त्यांची बालपणीची मैत्रीणही त्यांच्या बरोबर अनंताच्या प्रवासाला निघून गेली..