मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : अभिनेता गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. जुलै महिन्यात गश्मीरचे वडील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं होतं. यावेळी ते कुटुंबापासून दूर एकटेच तळेगाव इथल्या एका सदनिकेत राहत होते. या घटनेनंतर गश्मीर आणि त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने नेटकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने त्याच्या आईच्या प्रकृतीविषयीही अपडेट्स दिले आहेत.
‘तुमची आई आता ठीक असेल अशी अपेक्षा करतो’, असं एकाने म्हटलं. त्यावर गश्मीरने लिहिलं, ‘आजच आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ती सध्या फिट अँड फाइन आहे.’ त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी प्रश्न विचारल्यावर गश्मीरने उत्तर दिलं, ‘होय, खूप प्रोजेक्ट्स आहेत. पण गेल्या आठवड्यात आईची प्रकृती खालावल्याने तिची काळजी घेण्यात व्यग्र होतो. आता ती ठीक आहे. पुढील पंधरा दिवसांत मी कामावर परतेन.’
‘काही दिवसांपूर्वी तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यावर ट्रोल करणाऱ्यांना काय उत्तर देशील’, असाही सवाल गश्मीरला एका नेटकऱ्याने केला. त्यावर त्याने लिहिलं, ‘कधीकधी मला उत्तर द्यायची इच्छा होते. पण मग विचार येतो की का? ते माझं आयुष्य जगत नाही आणि जरी त्यांची इच्छा असली तरी ते माझं आयुष्य जगू शकत नाहीत. त्यामुळे शांत राहणंच योग्य आहे. त्यांच्याकडे मोकळा वेळ आहे, पण मला बऱ्याच लोकांची काळजी घ्यायची आहे आणि माझ्या हातात बरंच कामसुद्धा आहे.’
अशी कोणती गोष्ट आहे जी एखाद्या भूमिकेला आव्हानात्मक बनवते, असं विचारल्यावर गश्मीरने सांगितलं, ‘मला त्याबद्दल काही माहीत नाही. पण माझी सध्याची परिस्थिती ही मी भविष्यात साकारणाऱ्या व्यक्तीरेखांसाठी मोठी भूमिका बजावेल असं वाटतंय. कदाचित मी तो सर्व गोंधळ आणि त्या वेदना माझ्या भूमिकेतून मांडेन.’ गेल्या काही आठवड्यात जे काही घडलं, त्यातून काय शिकलास असाही प्रश्न एका युजरने त्याला विचारला. त्यावर उत्तर देताना गश्मीरने लिहिलं, ‘हातात मोबाइल आणि मोफत डेटा असलेली व्यक्ती त्याच्या अंधाऱ्या खोलीत बसून एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल काहीही मतं मांडू शकते. तेसुद्धा खरं काय घडलंय याची काहीच माहिती नसताना.’
तू ज्या परिस्थितीला सामोरं गेलास, त्यानंतर आयुष्याकडे पाहण्याचा तुझा दृष्टीकोन बदलला का?
– नाही, मी लहानाचं मोठं होत असताना याहून वाईट परिस्थितीचा सामना केला आहे. त्याबद्दल कोणालाच काही माहीत नाही.
आयुष्यातील तुझी सर्वांत मोठी खंत कोणती?
– मी कितीही प्रयत्न केले तरी सर्वोत्कृष्ट पिता, सर्वोत्कृष्ट पती, सर्वोत्कृष्ट मुलगा, सर्वोत्कृष्ट भाऊ बनू शकत नाही. पण येत्या 12 वर्षांत मला काही उत्तम चित्रपट करायचे आहेत.
आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. काही घडत नाहीये, काय करू?
– मी पण त्याच प्रॉब्लेममधून चाललो आहे.
मी रवींद्र महाजनी यांचा खूप मोठा चाहता आहे. मी लहानपणी बरेच मराठी चित्रपट पहायचो. त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो?
– मुंबईचा फौजदार
जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारखं नाही होत, असं वाटतं तेव्हा तू स्वत:ला कसं बघतो?
– ज्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या त्या मी पुढील काही वर्षांत घडवून आणणार.